
वर्धा : जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर भूमिका घेत धडक कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सेलू पोलीस ठाणे हद्दीत छापा टाकत गांजा विक्री करणाऱ्या आरोपींना रंगेहाथ पकडले असून, त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत २४ मार्च २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे मौजा हिंगणी (वार्ड क्र. १) येथे गिताबाई हरिभाऊ चुटके हिच्या राहत्या घरावर छापा टाकण्यात आला.
या कारवाईदरम्यान गिताबाई चुटके व तिचा नातजावई रोशन कुमार उर्फ रोशनसिंग तुलसी सहाणी (रा. अमृत कॉलनी, लुधियाना, पंजाब; सध्या हिंगणी) हे दोघे संगनमताने गांजा विक्री करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्यांना घटनास्थळीच रंगेहाथ पकडले. प्राथमिक तपासात हा गांजा बुट्टीबोरी येथील गणेशनगर सातगाव परिसरातील मधु गुजरकर या इसमाकडून आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात पार पडली. पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषसिंग ठाकूर, उपनिरीक्षक प्रकाश लसुंते तसेच पोलीस कर्मचारी अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अभिषेक नाईक आणि प्रिती धवळे यांचा समावेश होता.


























































