
पवनार : पवनार हे स्व. दत्ताजी मेघे यांची जन्मभूमी व कर्मभूमी असल्यामुळे त्यांचे कार्य आणि स्मृती चिरंतन राहाव्यात, या उद्देशाने त्यांच्या नावाने पवनार येथे भव्य सांस्कृतिक सभागृह उभारण्यात येणार असल्याची घोषणा विधानपरिषद सदस्य आमदार अभिजीत वंजारी यांनी केली. स्व. दत्ताजी मेघे यांच्या रक्षा विसर्जन कार्यक्रमासाठी पवनार येथे आले असता त्यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. या प्रकल्पासाठी आवश्यक जागा ग्रामपंचायतीकडून उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यासाठीचा ठराव लवकरच मंजूर करून पुढील प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
यावेळी स्व. मेघे यांची प्रतिमा ग्रामपंचायतीला भेट देण्यात आली. ग्रामपंचायतीचे प्रशासक राजू गलांडे यांना या प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली असून, सर्व कायदेशीर प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी वासुदेव राऊत, सामाजिक कार्यकर्ते जयंत गोमासे, बबलू राऊत (जिल्हा संयोजक, बजरंग दल), ह. भ. प. अनंत महाराज साटोने, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत भोयर, हरिहर अंबुलकर, दिनकर बोरकर, तुषार कडू, शंतनु चकोले, भूषण वाटमोडे, लिपिक राजू उराडे, संगणक चालक सुचिता वैद्य, अनुबाई माजरे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.


























































