

पवनार : येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. या इमारतीमध्ये मुलींची शाळा भरत होती. इमारत जीर्ण झाल्याने १५ वर्षापूर्वी येथील शाळा स्थलांतरित करण्यात आली. या जीर्ण झालेल्या इमारतीला पाडण्याबाबतचा पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठविला आहे. परंतु अद्यापही मंजुरी मिळाली नसल्याने पाडकाम कधी होणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
जिल्हा परिषद शाळेच्या जीर्ण इमारतीला पाडण्याकरिता सन २०२१ पासून पंचायत समितीकडे ठराव पाठविण्यात आला. परंतु अद्यापही मंजुरी मिळाली नाही. ६ जुलै २०२३ रोजी परत ठराव घेऊन तो पंचायत समितीकडे मंजुरीकरिता पाठविला. तरीही त्यावर काहीही निर्णय घेतला नाही. या इमारतीचा वापर सध्या अवैध व्यवसाय जसे दारू विक्री करणे, दारू लपविणे, जुगार खेळणे या कामांसाठी केला जात आहे. इमारत ही बाजार चौकामध्ये असल्याने वापर मोठ्या प्रमाणात होतो. अशातच जर ती इमारत ढासळली, तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यांचे गांभीर्य ना ग्रामपंचायत प्रशासनाला आहे; ना पंचायत समितीला. आमसभेमध्ये सुद्धा जीर्ण इमारतीचे पाडकाम करण्याबाबत ठराव घेण्यात आले. परंतु त्याची सुद्धा दखल घेतली जात नाही. या इमारतीचे पाडकाम केल्यास त्या जागेचा उपयोग खेळाचे मैदान म्हणून केला जाऊ शकतो.
प्रतिक्रिया….
शाळेची जीर्ण झालेली इमारत पाडण्यास मंजुरी घ्यावी लागते, तशी मंजुरीही मागितली आहे. परंतु ती अजून न मिळाल्याने पाडकाम करता आले नाही. मंजुरी मिळताच इमारत पाडली जाईल.
अजिनाथ डमाळे, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालय, पवनार