नराधमाने लुटले होते अल्पवयीन मित्र-मैत्रिणीचे महागडे मोबाईल! पवनार येथील हत्या प्रकरण

वर्धा : पवनार येथील अल्पवयीन मुलीला विवस्त्र करीत मृतदेह खड्ड्यांत पुरल्याचे प्रकरण उजेडात येताच पोलिसांनी आरोपी सतीश जोगे याला बेड्या ठोकल्या होत्या. या प्रकरणाला चार ते पाच दिवसांचा कालावधी उलटला असताना आरोपी सतीश जोगे याने नंदीखेडा परिसरात फिरायला गेलेल्या अल्पवयीन मुला-मुलीचे मोबाईल जबरीने हिसकावून नेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असून याप्रकरणी आरोपी सतीश जोगे विरुद्ध नव्याने सेवाग्राम पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आरोपी सतीश जोगे याने अल्पवयीन मुलीला पळवून नेत धामनदीपात्रालगत एका निर्जनस्थळी नेऊन विवस्त्र करीत गळा आवळून तिचा मृतदेह खट्ट्यात पुरला होता. पोलिसांनी तपासादरम्यान आरोपी सतीश जोगे याला अटक केली होती. सध्या आरोपी सतीश जोगे हा पोलीस कोठडीत आहे. घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास १६ वर्षीय मुलगा त्याच्या मैत्रिणीसोबत पवनार येथील नंदिखेडा परिसरात फिरायला गेले होते. दरम्यान, आरोपी सतीश जोगे हा त्यांच्याजवळ आला आणि दोघांचेही महागडे मोबाईल जबरीने हिसकावून घेतले. इतकेच नव्हेतर पोलिसांना सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती.

पोलिसांनी तपासादरम्यान त्याची चौकशी केल्यावर पोलीस तपासात ही बाब उघडकीस आल्याने मोबाईलधारक अल्पवयीन मुलाने याबाबतची तक्रार सेवाग्राम पोलिसांत दिली असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३९२, ५०६ भादवि अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सेवाग्राम ‘पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here