ग्राहकांची फसवणूक करून केली भूखंडाची विक्री! न.प.ची पोलीस ठाण्यात तक्रार; कारवाईची मागणी

सिंदी : हिंगणघाट येथील जितेंद्र कामडी याने सिंदी येथील एका शेतात नंदी टाऊन नावाने २०१६ ते २०१९ मध्ये ले-आऊट टाकून सर्व सुविधा असल्याचे खोटे सांगून ग्राहकांना भूखंड विक्री केले. दरम्यान, भूखंडधारक गणेश पोले, संजय भन्साली यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र, कारवाई न झाल्याने न.प. च्या वतीने आता पोलीस ठाण्यात ले-आऊट मालकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे कारवाईकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.

जितेंद्र कामडी याने शहरात टाकलेल्या ले-आऊटची नगर परिषदेकडून रीतसर परवानगी घेतली होती. मात्र, ले-आऊट टाकताना त्या ले-आऊटमध्ये रस्ते, नाल्या, पथदिवे, विद्युतपुरवठा घेण्यासाठी रोहित्र लावणे आदी विकासकामे करणे आवश्यक होते. लेआऊट मालकाने केवळ रस्ते, पथदिव्यासाठी खांब उभे करून ठेवले. रोहित्र अद्यापही बसविले नसल्याने ले-आऊटमध्ये भूखंडधारकांना वीज वितरण कंपनी वीजजोडणी देण्यास नकार देत आहे.

याबाबत भूखंडधारकांनी न.प.कडे वारंवार तक्रारी केल्या, न.प.ने याप्रकरणी ले-आऊट मालकाशी पत्रव्यवहारही केला. मात्र, ले-आऊट मालकाने कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे न.प.ने ले-आऊट मालकाने भूखंडधारकांची फसवणूक केल्याची तक्रार सिंदी पोलीस ठाण्यात केली असून, कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पालकामंत्री सुनील केदार यांनीदेखील ले-आऊट मालकाविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश पोलीस विभागाला दिल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here