चला, सौर ऊर्जेच्या प्रकाशात झळकणाऱ्या विदर्भातील गावाला जाऊया…ना लाईट बील, ना लोडशेडिंग

वर्धा : मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाशाची उपलब्धता असूनही आपल्याकडे सौरऊर्जेचा फार कमी उपयोग केला जातो. मात्र, हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट (राठी) या गावात सर्व काम आता सौरऊर्जेचा वापर करूनच होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे चिचघाट हे गाव विदर्भातील पहिले संपूर्णपणे सौरऊर्जेचा वापर करणारं गाव ठरले असून संपूर्ण गाव सौरऊर्जेच्या प्रकाशात झळकणार आहे.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेच्या केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेच्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता हेमंत पावडे यांच्या मार्गदर्शनात ‘मॉडल सोलर व्हिलेज’ या अंतर्गत विद्युत विभागाकडून हा उपक्रम राबविण्यात आला. अवघ्या तीन महिन्यातच हा प्रोजेक्ट पूर्ण करून चिचघाट गाव विदर्भातील पहिले सौरग्राम ठरले आहे. हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट (राठी) गाव अवघ्या १८७ लोकसंख्या असलेले तसेच ७० घरे असलेले गाव आहे. हे गाव शहरालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीजवळ वसले आहे.

विविध अडचणींचा सामना करत विद्युत विभागाने यासाठी बँक ऑफ बडोदा यांच्या संयुक्त वतीने कार्यशाळा घेत गावकऱ्यांचे प्रबोधन करत या प्रकल्पाच्या दिशेने वाटचालीला सुरवात केली होती. या प्रकल्पाला शंभर टक्के शासकीय बँकेचे अर्थसाहाय्य देखील लाभले. मात्र, बँक फायनान्स दरम्यान अनेक अडचणींमुळे हा प्रकल्प मार्गी लागणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण होऊ लागली होती. विद्युत विभागातील अधिकारी आणि कार्यकारी अभियंता यांनी येणाऱ्या सर्व अडचणींवर मात करत प्रकल्पाला गती देण्याचे काम केले.

विविध त्रूटी दूर सारत लाभार्थ्यांना योजनेचा लाभ कसा मिळवून देता येईल, याबाबत शर्तीचे प्रयत्न करून प्रकल्पाला चालना दिली. परिणामी, चिचघाट हे गाव शंभरटक्के सौरग्राम ठरले आहे. विशेष म्हणजे यासाठी बँक ऑफ बडोदा ही महत्त्वाचा दुवा ठरली. शासनाच्या जन समर्थ या पोर्टलद्वारे सौर प्रकल्पासाठी आवश्यक असलेले अर्थसाह्य बँकेने मिळवून दिले.

टीनाच्या आणि कौलारू घरांवरही सोलर…

चिचघाट (राठी) गावात आवश्यकतेनुसार ७० रहिवासी असलेल्या घरांना सौरऊर्जा पॅनलची जोडणी करण्यात आली आहे. यामध्ये सुद्धा अपवादात्मक परिस्थितीवर मात करत २८ टीनांच्या आणि कौलारू घरे असलेल्या रहिवासी नागरिकांना देखील या योजनेचा लाभ देण्यात आला असून त्यांचेही नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट (राठी) गाव आता सौर ऊर्जेच्या प्रकाशात झळकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here