नाश्ता करणे पडले महागात! डिक्कीतून दलालाचे ४ लाख लंपास; हिंगणघाट येथील घटनेने खळबळ; पोलिसात गुन्हा दाखल

वर्धा : नाश्ता करण्यासाठी थांबलेल्या बाजार समितीतील दलालाच्या दुचाकीच्या डिक्कीतून अज्ञात चोरट्याने तब्बल ४ लाख रुपये चोरून नेल्याची घटना मोहता चौक परिसरात घडली. या घटनेने हिंगणघाट शहरात खळबळ उडाली असून, या प्रकरणी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, सागर हनुमान वादाफळे (३२) हा हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दलालीचे काम करतो. त्याने शेतकऱ्यांच्या चुकाऱ्याचे ४ लाख ९८ हजार रुपये घरून घेत, एम.एच.३२ ए.आर. १२९४ क्रमांकाच्या दुचाकीने शिवाजी मार्केट यार्डमध्ये पोहोचला. त्याने जवळील पैसे एका पिशवीत ठेवून त्याच्या खोलीतील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवली.

सकाळी ११ वाजताच्या सुमारास तो एचडीएफसी बँकेत गेला आणि तेथून धनादेशाद्वारे ३ लाख रुपये काढले व पैसे घेऊन मार्केट यार्डमध्ये जात भोजराज कामडी या दलालाचे दिवानजीकडून ५ लाख रुपये घेऊन शेतकऱ्यांचे १० लाख ९८ हजार रुपयांचे चुकारे दिले आणि २ लाख रुपये पिशवीत ठेवले. पुन्हा बँकेतून २ लाख रुपये काढले. एकूण चार लाख रुपये त्याने पिशवीत ठेवून दुचाकीच्या डिक्कीत ठेवली.

दरम्यान, सागरला भूक लागल्याने तो मोहता चौकात असलेल्या कचोरी सेंटरवर दुचाकी उभी करून नाश्ता करण्यास गेला. नाश्ता करून तो दुचाकीजवळ गेला असता, त्याला डिक्की उघडी दिसली, तसेच डिक्कीतून रोख रक्कमही लंपास झालेली दिसून आली. या प्रकरणी सागरने हिंगणघाट पोलिसात तक्रार दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here