शेळी चोर पोलिसांच्या गळाला! चोरीच्या शेळ्यांची चांदूरात केली विक्री

तारासावंगा : साहूर येथील रहिवासी असलेल्या तीन शेळी चोरट्यांना आष्टी पोलिसांना अटक करण्यात यश आले आहे. या चोरट्यांनी साहूर येथून चोरलेल्या शेळ्या जिल्ह्यातील चांदूर येथे जाऊन विक्री केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. या चोरट्यांकडून पोलिसांनी २३ हजारांची रोकड तसेच दोन दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

प्रज्योत शेषराव लाड यांच्या मालकीच्या शेतातील गोठ्यात बांधून असलेल्या सहा शेळ्या अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास चोरून नेल्या. शेळ्या चोरीच्या घटनेमुळे तब्बल ४० हजारांचे नुकसान झाल्याने लाड यांनी आष्टी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नॉद घेत तपासाला गती दिली.

दरम्यान खात्रीलायक माहितीच्या आधारे पोलिसांनी साहूर येथील रहिवासी असलेल्या हरीश रवींद्र वाघ (२२), मंगेश अरुण माहुरे (२८), शुभम अरुण वडस्कर (२४) यांना ताब्यात घेत विचारपूस केली. सुरुवातीला उडवा-उडवीची उत्तरे देणाऱ्या चोरट्यांना पोलिसी हिसका मिळताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.शिवाय चोरीच्या सहा शेळ्या अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथील एकाला २३ हजारांमध्ये विक्री केल्याची कबुली दिली.

या रकमेसह पोलिसांनी चोरट्यांकटून चोरीच्या घटनेत वापरलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई आष्टीचे ठाणेदार लक्ष्मण लोकरे यांच्या मार्गदर्शनात आष्टी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here