पशुपालकांत दहशत! ३० दिवसात १३ गाईंचा मृत्यू; नुकसानग्रस्तांना तातडीची शासकीय मदत देण्याची मागणी

कारंजा (घाडगे) : तालुक्‍यातील बोरी या गावात अवघ्या ३० दिवसात तब्बल १३ गाईंचा मृत्यू झाल्याने पशुपालकांमध्ये दहशत पसरली आहे. एकामागून एक पाळीव जनावरे अचानक दगावत असल्याने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूने गावात येऊन पशुपालकांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

सततच्या पावसामुळे पूर्वीच कापूस व सोयाबीन उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. अशात काही शेतकऱ्यांनी पशुपालन व्यवसायाची जोड शेतीला दिली आहे. परंतु, मागील महिन्याभऱ्यापासून अचानक प्रकृती बिघडून पाळीव जनावरे दगावत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. बोरी गावातील शेतकऱ्यांसह पशुपालकांवर ओढवलेल्या संकटाची माहिती युवा शेतकरी प्रवीण धोटे यांनी पं. स.च्या पशुसंवर्धन विभागाला दिल्यावर डॉ. राजेंद्र घुमडे यांनी बोरी गाव गाठून जनावरांची तपासणी केली. पण अजूनही जनावरांचे मृत्यूसत्र सुरूच असल्याने जिल्हा पातळीवरील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूने बोरी गाहून पशुपालकांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

शिवाय नुकसानग्रस्त पशुपालकांना शासकीय मदत देण्याची मागणी होत आहे. १ हजार ५०० लोकसंख्या असलेल्या बोरी या गावात ३०० हून अधिक पशुधन आहे. परंतु, अचानक प्रकृती खालावून पाळीव जनावरे दगावत असल्याने गावातील पशुपालकांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. तालुका प्रशासनाने या प्रकरणी लक्ष देण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here