बनावट सोनं देऊन ऑटोचालकाची फसवणूक! दोन आरोपींना बेड्या

वर्धा : बनावट सोनं देऊन २० हजारांची रक्‍कम घेत ऑटोचालकाची फसवणूक केल्याची घटना २६ रोजी दाभा परिसरात असलेल्या रेल्वे रुळानजीक घडली. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या. धनराज भोसले आणि चारू फिरोज पठाण असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रशांत मनोहर उमाटे रा. संत ज्ञानेश्‍वर नगर, म्हसाळा वर्धा. हा ऑटोचालक असून त्याच्या ऑटोत दोन्ही आरोपी प्रवास करीत होते.

दरम्यान दोघांनी आमच्याकडे सोनं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा, असे म्हणत मोबाईल क्रमांक घेतला. त्यानुसार प्रशांत यांच्या मोबाइलवर धनराजचा फोन आला आणि सोने पाहिजे असल्यास दाभा परिसरात असलेल्या रेल्वे रुळाजवळ या असे म्हणाला. त्यानुसार प्रशांत उमाटे हे तेथे गेले असता आरोपी धनराज भोसले आणि चारू फिरोज पठाण हे दोघे त्यांना भेटले. त्यांनी प्रशांतला खरं सोन आहे असे भासवून २० हजारांची रक्‍कम घेऊन बनावट सोनं देत फसवणूक केली.

ही बाब प्रशांत उमाटे याच्या लक्षात येताच आपली फसवणूक झाल्याचे त्याला समजले. त्याने याबाबतची तक्रार हिंगणघाट पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ तपासचक्र फिरवून दोन्ही आरोपींना हिंगणघाट येथील रेल्वे फाटक परिसरातून अटक केली. हिंगणघाट परिसरात सध्या फसवणूक करणाऱ्या भामट्यांची टोळी सक्रीय झालेली आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे. तसेच नागरिकांनी देखील अशा भामट्यांपासून सावध राहण्याची नितांत गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here