मनुष्याच्या कुजलेल्या मृतदेहाचा सांगाडा सापडला! मेंढुला शिवारातील धक्कादायक घटना

समुद्रपूर : नजीकच्या मेंढुला शिवारातील पोथरा (झुणका) कॅनल जवळ पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत एका व्यक्‍तीच्या मृतदेहाचा सांगाडा आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. ही घटना बुधवारी उघडकीस आली. समुद्रपूर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे. हिंसक प्राण्यांनी हल्ला चढवून संबंधित व्यक्तीस ठार केल्याचा अंदान पोलिसांकडून व्यक्‍त केला जात असला, तरी सर्व बाजूंनी पोलीस शहानिशा करीत आहित. संदीप जनार्धन चिताडे असे मृत व्यक्तीचे नाव असल्याचे सांगण्यात आले.

मेंढुला येथील रहिवासी मयूर वैद्य हे शेतातून घराच्या दिशेने परतीचा प्रवास करीत असताना त्यांना पोथरा (झुणका) कॅनलच्या लगत मनुष्याच्या मृृतदेहाचा सांगाडा दिसून आला. त्यानंतर त्यांनी तातडीने ग्रामस्थांना माहिती देत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच समुद्रपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मनुष्याच्या मृतदेहाचा सांगाडा ताब्यात घेत मृताची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अशातच घटनास्थळी पोहोचून अधिकची माहिती जाणून घेत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक राम खोत यांना परिसरातील एक व्यक्‍ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर संबंधित व्यक्‍ती तो तर नाही ना याची शहानिशा करण्यात आली. प्राथमिक चौकशीअंती मृतकाची ओळख पटली. शिवाय तो घटनास्थळापासून जवळच राहत असल्याचेही पुढे आले. मृताच्या नातेवाइकांच्या मदतीने मृताची ओळख पटविण्यात आली. या घटनेची नोंद समुद्रपूर पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here