
वर्धा : नादुरुस्त ट्रक रस्त्याच्या बाजूला करण्याच्या कारणातून झालेल्या वादात ट्रक दुरुस्त करीत असलेल्या चालकाच्या गळ्यावर सुऱ्याने वार करीत जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना नंदोरी चौक परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
शेख आसिफ शेख फरीद (४०, रा. शास्त्री वॉर्ड) असे जखमीचे नाव असून त्याच्यावर हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. शेख आसिफ शेख याच्या म्रालकीचा ट्रक नंदोरी चौक परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावर बंद पडल्याने तो ट्रक दुरुस्त करीत होता. दरम्यान, आरोपी रोहित गोंदे हा दुचाकीने रस्त्यावरून जात असताना त्याने शेख आसिफ शेख याला ट्रक रस्त्याच्या बाजूला घे असे म्हटले.
आसिफने ट्रक दुरुस्त केल्यावर बाजूला घेईन, असे म्हटले असता रोहितने शिवीगाळ करून वाद करीत भाजी कापण्याच्या सुऱ्याने आसिफचा गळा चिरला. यात आसिफ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी जखमीच्या बयानावरून हिंगणघाट पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत.