
आर्वी : पत्नीवर दवाखान्यात उपचार करून घरी परत दुचाकीने जाणाऱ्या दाम्पत्यास दुचाकीने पाठलाग करणाऱ्या तिघांनी रस्त्यात अडवून तलवारीचा धाक दाखवून पत्नीच्या गळ्यातील ९ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावून नेले. परिसरातील नागरिकांच्या मदतीने एका आरोपीला पकडण्यात यश आले तर दोन आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले. ही घटना सावळापूर नजीकच्या घाट रस्त्यावर १६ रोजी रात्रीच्या सुमारास घडली.
सागर शिंदे हा पत्नी सुवर्णा हिच्यावर उपचार झाल्यानंतर एम. एच. ३२ ए. बी. २२८२ क्रमांकाच्या दुचाकीने परतीचा प्रवास करीत होते. ते आर्वी येथून बेडोणा गावाकडे जात असताना घाट रस्त्यावर तीन अज्ञात व्यक्ती हातात तलवार घेऊन दुचाकीने आले. सागरने दुचाकी सुसाट नेली असता समोरुन बैल आल्याने दोघेही पडले. यात सागर व त्याच्या पत्नीला दुखापत झाली. दरम्यान दुचाकीने आलेल्या तिघांनी तलवारीचा धाक दाखवित सुवर्णाच्या गळ्यातील मंगळयूत्र हिसकाविले. दरम्यान सागर शिंदे, त्याचे वडील आनंद बाजीराव शिंदे, गजानन शिंदे हे तेथे आले त्यांनी तीन लुटारुंपैकी अनिकेत तायडे यास पकडून ठेवले तर अन्य दोघांनी तेथून पळ काढला.


















































