Home ◼️ संपादकीय बसस्थानक परिसरात खाजगी प्रवासी वाहतुकीवर निर्बंध ; ३८ वाहनांवर कारवाई, ४६ हजारांचा...

बसस्थानक परिसरात खाजगी प्रवासी वाहतुकीवर निर्बंध ; ३८ वाहनांवर कारवाई, ४६ हजारांचा दंड

वर्धा : जिल्ह्यातील बसस्थानक परिसरात वाढती वाहतूक कोंडी, अवैध प्रवासी वाहतूक आणि एसटी सेवेवर होणारा परिणाम लक्षात घेता बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात खाजगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या अनुषंगाने वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवून ३८ लक्झरी व खाजगी वाहनांवर कारवाई करत ४६ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

वर्धा शहरासह जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात खाजगी वाहन चालकांकडून मोठ्या प्रमाणावर वाहने उभी करून प्रवासी वाहतूक केली जात असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती. तसेच एसटी बसच्या नियमित वाहतुकीवरही त्याचा परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले होते.

या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या निर्देशानुसार वाहतूक शाखेला विशेष उपाययोजना राबविण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार बसस्थानक परिसरातील २०० मीटरच्या आत खाजगी प्रवासी वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला असून अवैध प्रवासी वाहतुकीवर आळा घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच बसस्थानकाच्या प्रवेशद्वार आणि निर्गमद्वारावर दररोज दोन वाहतूक अंमलदार नियुक्त करून वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यानुसार वाहतूक पोलिसांनी बसस्थानक परिसरात तपासणी मोहीम राबवून २०० मीटरच्या आत उभी असलेल्या ट्रॅव्हल्स व खाजगी वाहनांवर मोटार वाहन कायद्याच्या कलम १२२/१७७ अन्वये कारवाई केली. या मोहिमेत ३८ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून एकूण ४६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

दरम्यान, लक्झरी बस चालक व वाहतूक व्यावसायिकांची बैठक घेऊन बसस्थानक परिसरात खाजगी वाहने उभी न करणे, तसेच अवैध प्रवासी वाहतूक टाळण्याबाबत सूचना देण्यात आल्या. वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनही वाहतूक शाखेने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!