Home ◼️ संपादकीय सावंगी बायपासवर भीषण अपघात; दोन महिलांचा जागीच मृत्यू ! पाच जण गंभीर...

सावंगी बायपासवर भीषण अपघात; दोन महिलांचा जागीच मृत्यू ! पाच जण गंभीर जखमी

वर्धा : वर्ध्यातील सावंगी बायपास महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पंढरपूर आणि अक्कलकोट येथे दर्शन आटोपून नागपूरकडे परतणाऱ्या भाविकांच्या चारचाकी वाहनाची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसल्याने हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील काही भाविक पंढरपूर व अक्कलकोट येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून ते चारचाकी वाहनाने नागपूरकडे परतत असताना वर्धा जिल्ह्यातील सावंगी बायपास परिसरात भरधाव वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळले. धडक इतकी भीषण होती की वाहनाचा समोरील भाग पूर्णपणे चुराडा झाला. या भीषण अपघातात वाहनातील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिस व मदत पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना वाहनातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना प्राथमिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले असून पुढील उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. अपघात नेमका कशामुळे झाला, चालकाला डुलकी लागली होती का, वाहनाचा वेग अधिक होता का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!