वर्धा : अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे ९ ट्रक पोलिसांनी जप्त करून १ कोटी ३७ लाख रुपयांचा वाळूसाठा स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला. हा वाळूसाठा तळेगाव व कारंजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जप्त केल्याची माहिती आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सौरभ घरडे कर्मचाऱ्यांसह रात्रगस्त घालीत असताना गुरुनानक ढाब्याजवळ छापा टाकला असता पाच ट्रकमध्ये अवैधरीत्या वाळू भरलेली दिसून आली. पोलिसांनी याप्रकरणी ९४ लाख रुपयांचा वाळूसाठा जप्त करून आरोपी शाहरुख भरू बेनीवाले, शेख मुजफ्फर शेख जब्बार, शाहरुख खान अहमद खान, शेख रिहान शेख रहीम, खुशाल हरिभाऊ वानखेडे या पाच आरोपींना अटक करून तळेगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव परिसरातून बिनधास्तपणे वाळूची वाहतूक होत असल्याने याकडे महसूल विभागाने डोळे मिटले असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. त्यामुळे शासनाचा कोटी रुपयांचा महसूल बुडत असल्याने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.