प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना! असंघटीत कामगारांना 60 वर्षानंतर दरमहा 3 हजार मानधन; कामगारांनी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

वर्धा : असंघटीत क्षेत्रातील कामगारांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत सहभाग नोंदविणाऱ्या कामगारांना वयाची 60 वर्षे पुर्ण केल्यानंतर दरमहा 3 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. या योजनेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त असंघटीत कामगारांना सामावून घेतले जात आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशातील निवडक 75 जिल्ह्यांमध्ये अंत्योदय अभियान राबविण्यात येत आहे. त्यात वर्धा जिल्ह्याचा देखील समावेश आहे. या अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या 17 योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत द्यावयाचा आहे. यामध्ये प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा सुध्दा समावेश आहे. जिल्ह्यातील प्रत्येक असंघटीत कामगारांची योजनेंतर्गत नोंदणी करण्याचे उद्दिष्ठ आहे.

केंद्र शासनाच्या कामगार व रोजगार मंत्रालयाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या या योजनेत असंघटीत क्षेत्रात काम करणारे 18 ते 40 वर्ष वयोगटातील कामगार पात्र आहेत. कामगाराचे सद्याचे मासिक उत्पन्न 18 हजार रुपयांच्या आतील असावेत. कामगार कर्मचारी राज्य विमा योजना, भविष्य निर्वाह निधी किंवा राष्ट्रीय पेन्शन योजनेचा सभासद नसावा. या योजनेचे सभासद असलेले कामगार श्रमयोगी मानधन योजनेसाठी पात्र ठरत नाही.

या योजनेत सहभाग घेण्यासाठी कामगारास प्रतिमाह वयानुसार फक्त 55 ते 200 रुपये वयाच्या 60 वर्षापर्यंत अंशदान म्हणून जमा करावे लागते. वयाचे 60 वर्ष पुर्ण झाल्यानंतर कामगारास प्रतिमाह 3 हजार इतके मानधन दिले जातील. यासाठी कामगार आपली नोंदणी नागरी सुविधा केंद्रात संपर्क साधून करू शकतात. तसेच https://maandhan.in या पोर्टलवर कामगार स्वत: नोंदणी करु शकतात. योजनेच्या अधिक माहितीसाठी 1800 267 6888 किंवा 14434 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येईल. आयुष्यभर कष्ट करून थकलेल्या असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी ही योजना अतिशय फायदेशिर आहे. योजनेत समावेशासाठी कामगारांना भरावे लागणारे अंशदान अगदी नाममात्र आहे. जिल्ह्यातील प्रत्येक असंघटीत कामागाराने या योजनेत सहभागी होऊन योजनेचा लाभ घेतला पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here