योजना कुचकामी ठरल्याची ग्रामस्थांची ओरड! पाणीपुरवठा योजनेवर दीड कोटींचा खर्च; तरी हिंगणीकर तहानलेलेच

हिंगणी : पिण्याच्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्याकरिता दीड कोटी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र, वर्षभरापासून ग्रामस्थांना थेंबभरदेखील पाणी मिळाले नसल्याने योजना कुचकामी ठरल्याची ओरड होऊ लागली आहे.

ग्रामपंचायतीची सदस्यीय संख्या १५ असून १० हजार गावाची लोकसंख्या आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रामस्थांना पाणी टंचाईचे चटके सोसावे लागत आहेत. जलसंकट कायमचे निकाली काढण्याच्या अनुषंगाने शासनाने राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेला १ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी पाणीपुरवठा योजनेकरिता मंजूर केला. तांत्रिक सल्लागार ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद वर्धा, राष्ट्रीय पेयजल योजना या निधीतून २०१७-१८ या वर्षांत २ लाख २५ हजार लिटर क्षमतेचा जलकुंभ उभारण्यासह जलवाहिनी अंथरण्यात आली. पाणीपुरवठ्याकरिता घरोघरी नळजोडणी देण्यात आल्या. प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम पूर्णत्वास जाऊन २६ जुलै २०२० रोजी लोकार्पण सोहळासुद्धा थाटामाटात पार पडला. मात्र, वर्ष लोटूनही योजना ठप्प आहे.

या योजनेचे काम करणाऱ्या कंत्राटदाराचे संपूर्ण देयके अदा झाले. पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली म्हणून ग्रामस्थांनी अनामत रक्कम भरून नळजोडणीकरिता अर्जसुद्धा केले. मात्र, एक वर्षापासून एक थेंबभरसुद्धा पाणी ग्रामस्थांना मिळाले नाही. तसेच राम टेकडीवरील बांधण्यात आलेला जलकुंभसुद्धा अद्याप उघडा असून कोरडाच आहे. कोटी रुपये खर्च करूनही योजना कार्यान्वित न झाल्याने कुचकामी ठरल्याची ओरड आता ग्रामस्थ करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here