

वर्धा : बाथरूमच्या व्हॅंटिलेटरचा बार तोडून घरात प्रवेश करीत चोरट्याने दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ६७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना लहरी नगर परिसरातील अपना कॉलनी परिसरात १४ रोजी सकाळी उघडकीस आली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अमोल आनंद गायकवाड हे न्यू आर्टस् कॉलेजमध्ये संचालक पदावर कार्यरत आहेत. अमोल गायकवाड व त्यांची पत्नी हे दोघेही १२ रोजी नागपूर येथे शिक्षण घेत असलेल्या मुलांना भेटण्यासाठी गेले होते. १४ रोजी ते परत वर्ध्याला येत असताना घरकाम करणाऱ्या बाईचा फोन आला आणि घराचे दार उघडे दिसत असल्याचे सांगितले.
अमोलने त्याचा मित्र सचिन याला फोन करून घरी जाण्यास सांगितले. घराची पाहणी केली असता सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडून असल्याचे दिसून आले. काही वेळानंतर अमोल पत्नीसह कारने घरी पोहोचले असता त्यांनी घराची पाहणी केली. दरम्यान दुसऱ्या माळ्यावरील एका खोलीतील लाकडी कपाटात ठेवलेले सोन्याची अंगठी, सोन्याचे दोन कानातले सेट आणि 3२ हजार रुपयांची रक्कम असा एकूण ६७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेलेला दिसून आला. चोरट्याने बाथरूमच्या व्हेंटिलेरचा बार वाकवून घरात प्रवेश करीत चोरी केल्याचे दिसून आले. पोलिस निरीक्षक हेमंत चांदेवार यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. ठसेतज्ज्ञांनादेखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. पुढील तपास रामनमर पोलिस करीत असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.