अनाथांची माय सिंधुताई सपकाळ; खडतर प्रवास आणि शेकडो पुरस्कार

सुरेश गणराज

पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 ला वर्धा जिल्ह्यातील पिपरी-मेघे येथे झाला. त्यांचा वडिलांचे नाव अभिमान साठे. वर्धा जिल्ह्यातील माळेगाव (नवरगाव फॉरेस्ट) येथील श्रीहरी सपकाळ यांचे सोबत त्यांचे लग्न झाले. लग्नानंतरचे आयुष्य मात्र खडतर प्रवासाने सुरू झाले. वन-वन भटकणाऱ्या, अखंड भ्रमंती करणाऱ्या, स्वतःचे आयुष्य जाळणाऱ्या सिंधुताई पुढे अगणित अनाथांची माता झाली. त्यांना त्यांच्या कार्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेचे शेकडो पुरस्कार प्राप्त झाले. शासनाने सन्मानाने ”पद्मश्री”हा पुरस्कार दिला.

सिंधू ते पद्मश्री सिंधुताई सपकाळ हा त्यांच्या अत्यंत अवघड, अचंबित करणारा आणि तितकाच खडतर असा प्रवास होता. शालेय शिक्षण अवघ्या चौथ्या वर्गापर्यंत झालेले असले तरी त्यांना वाचनाची प्रचंड आवड. हातात आलेला कोणताही कागद त्या पूर्णपणे वाचून काढायचा, ही त्यांची सुरुवातीपासूनची सवय. कविता, गाणी त्यातल्या त्यात गझल हे त्यांचे आवडीचे क्षेत्र. त्यांच्या व्याख्यानात नेमक्या वेळी काही समर्पक शेर आणि कविता त्यांच्या तोंडून बाहेर पडायचा. मूळच्या गोड आवाजात, उगवत्या वाणीने समोरच्या जनसमुदायातील सर्व स्तरातील सहज साधला जाणारा सूसंवाद हे त्यांच वैशिष्ट्य.

त्यांच्या गाण्यात सुर, ताल, लय यावर विलक्षण हुकमत. साथीला संत तुकाराम, संत जनाबाई, बहिणाबाई, कबीर, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, यांच्या शुभाषितवजा रचनांचा परिपाक म्हणून त्या व्यक्त करीत असलेली आर्त वेदना थेट काळजात घुसल्यामुळे ती वेदना श्रोत्यांना आपलीच वाटायची.व्यक्तीमत्वातून-विभूतीमत्वाकडे सुरू झालेला त्यांचा प्रवास हा नंतर हळुहळू त्यांना स्वतः ला विवेकात्माकडे विलीन करत गेला आणि त्या स्वतःच स्वतःच्या राहिल्या नाही. मूलतः त्या कारुण्यामुर्ती, साक्षात वात्सल्यसिंधू त्यांचे खळखळत हसणे, हे वाहत्या निर्झरा सारखे निखळ, नितळ, आणि निरागस होते. त्यांचे अवघे आयुष्य हे संघर्षमय होते .

७-८ वर्षापूर्वी सिंधुताई सपकाळ यांच्या पुढाकाराने त्यांच्या सासरी माळेगाव या गावी मिलन सासर – माहेरचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी नागपूर येथील हिवाळी अधिवेशन काळात राज्यातील बरेच मंत्री कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांनी त्यावेळी समाजात वावरत असताना येत असेलल्या अनेक समस्यांचा ऊहापोह कोणाचीही पर्वा न करता निर्भिडपने मांडल्या होत्या. त्यावेळी त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व त्यातुन दिसून येत होते. हा अनुभव प्रत्यक्ष पाहायला मिळाला. त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळाली. तसेच दादाजी धूनिवला मठ, वर्धा येथे त्यांचे व्याख्याना दरम्यान त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी पुन्हा मिळाली, त्यावेळी त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यांच्याशी संवाद साधला.

मध्यंतरी सोनी च्यानेलवर त्यांना प्रत्यक्ष जगातील महानायकपैकी एक महानायक अमिताभ बच्चन यांच्या सोबत कोण बनेगा करोडपतीमध्ये संवाद साधतांना टीव्ही वर पाहायला मिळाले. त्यावेळी मनाला अतिशय समाधान मिळत होते. अनाथांची माय म्हणून जगभर परिचित असलेल्या सिंधुताई सपकाळ आयुष्यभर नियतीशी दोन हात करीत त्या या माऊलीने पुढे असंख्य अनाथांवर मायेची पाखर घातली. त्यांची आयुष्य सन्मार्गी लावली.

लेखक व्यक्तिमत्व विकास परामर्शक, व्याख्याते तथा अभिप्रेरक वक्ता आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here