स्वयंस्फूर्तीने कोरोनाची लस घेण्यात महिला योद्धाच पुढे

वर्धा : भारत देशासह संपूर्ण जगाला घाम फोडणाऱ्या कोविड-१९ विषाणूला अटकाव घालणारी प्रतिबंधात्मक लस तयार करण्यात आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांना यश आले आहे. सध्या कोविडयोद्ध्यांना हिच स्वदेशी लस दिली जात असून, अवघ्या १४ दिवसांत वर्धा जिल्ह्यातील ११ हजार ४९४ कोविड योद्ध्यांना कोरोनाची प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. विशेष म्हणजे लस घेणाऱ्यांत तब्बल ७ हजार २९६ महिला आहेत.

जिल्ह्यात आणि देशात १६ जानेवारीपासून महालसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला जिल्ह्यातील सहा केंद्रांवरून लसीकरण मोहीम राबविण्यात आली. तर नंतर टप्प्याटप्प्याने लसीकरण केंद्राच्या संख्येत वाढ करण्यात आली. सध्या जिल्ह्यातील १३ केंद्रांवरून कोविड योद्ध्यांना लस दिली जात आहे. आतापर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा या केंद्रावरून १ हजार ५२१, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथून १ हजार ९५, उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथून ९३१, ग्रामीण रुग्णालय सेलू येथून ६१९, ग्रामीण रुग्णालय पुलगाव येथून ७२६, ग्रामीण रुग्णालय समुद्रपूर येथून ५६४, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था सेवाग्राम (अ) येथून १ हजार १६४, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था सेवाग्राम (ब) येथून ५६२, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे (अ) येथून १ हजार ६०९, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे (ब) येथून १ हजार ३२, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे (क) येथून १ हजार ६२, ग्रामीण रुग्णालय कारंजा येथून ४३३ तर ग्रामीण रुग्णालय आष्टी येथून १७६ व्यक्तींना कोरोनाची प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे.

साडेनऊ हजार व्यक्तींचा विषाणूवर विजय
जिल्ह्याच्या कोविड बाधितांच्या संख्येने १० हजार २७७ चा आकडा गाठला असला तरी त्यापैकी ९ हजार ५९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ३१० व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. असे असले तरी सध्या जिल्ह्यात ३८५ ॲक्टिव्ह कोविड पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर उपचार होत आहे.

१.१६ लाख व्यक्तींची झाली कोरोना चाचणी
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख १६ हजार ३३८ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली असून, १ लाख १६ हजार ३३१ व्यक्तींचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे. त्यापैकी १ लाख ५ हजार १६३ व्यक्तींचा अहवाल कोविड निगेटिव्ह आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here