मुंबई: केंद्र सरकारनं राज्याला दर महिन्याला लसीचे किमान ३ कोटी डोस उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करणारा ठराव सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत मांडला. राज्यातील सध्याच्या परिस्थितीची माहिती देतानाच उपनगरीय लोकल ट्रेन सुरू करण्याबाबतही त्यांनी आश्वासक विधान केलं.
नियम ११० अन्वये राजेश टोपे यांनी हा शासकीय ठराव मांडला. ‘करोनाचा सर्वाधिक संसर्ग महाराष्ट्रात झाल्याचं आपल्याला आकडेवारीवरून दिसतं. सर्वाधिक रुग्ण आणि त्यामुळं झालेले मृत्यू महाराष्ट्रात झालेले आहेत. तसेच डेल्टा प्लस व्हेरिएंटचे २१ रुग्ण महाराष्ट्रात आढळलेत. म्युकर मायकोसिसचे देखील ५ हजार रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. राज्यात सामूहिक प्रतिकार शक्ती निर्माण करायची असेल तर राज्यातील जनतेचं लसीकरण मोठ्या संख्येनं होणं आवश्यक आहे. सध्या तिसऱ्या लाटेची चर्चा आणि भीती लोकांमध्ये आहे. या तिसऱ्या लाटेची दाहकता कमी करायची असेल तर त्याचंही उत्तर लसीकरण हेच आहे,’ असं टोपे म्हणाले.
‘करोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात निर्बंध लावले आहेत. दुपारी चार वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवणं, विकेंड लॉकडाऊन व मुंबईसारख्या शहरात लोकल बंद ठेवणं, असे पर्याय आपण स्वीकारले आहेत. मुंबईत लोकल सुरू करण्याची मागणी होत आहे, मात्र लसीकरण मोठ्या प्रमाणात झालं तरच लोकल सुरू करता येईल,’ असंही टोपेंनी स्पष्ट केलं.
‘राज्याच्या आरोग्य विभागाची दिवसाला १० लाख नागरिकांचे लसीकरण करण्याची क्षमता आहे. सार्वत्रिक लसीकरण आपल्याला दोन महिन्यांत पूर्ण करावं लागणार आहे. सध्या आपण १८ वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना लस देत आहोत. पण ५ वर्षांहून अधिक वय असलेल्या मुलांना लस द्यायचं ठरविल्यास आपल्याला लशींचे अधिक डोस लागणार आहेत. तरच आपण सार्वजनिक प्रतिकारक्षमता निर्माण करू शकतो. त्यासाठीच केंद्रानं राज्याला महिन्याला ३ कोटी डोस द्यावेत, अशी मागणी करावी लागणार असल्याचं ते म्हणाले.
‘लसीकरण करण्यात महाराष्ट्र देशात प्रथम आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये दुसरा डोस बाकी आहे, त्यांच्याकडं अधिक लक्ष द्यावं लागणार आहे. संसर्ग अधिक असलेल्या जिल्ह्यांकडंही लक्ष द्यावं लागणार आहे. तसंच, लसीकरणात जे जिल्हे मागे आहेत, त्यांनाही पुढे घेऊन जावं लागणार आहे,’ असंही ते म्हणाले.