

आष्टी (श) : नजीकच्या धाडी येथे तत्काळ एक लाख रुपयांच्या कर्जमंजुरी प्रक्रियेसाठी बचतगटाच्या महिलांकडून 4350 रुपये वसूल करत 20 पेक्षा अधिक महिलांची 2 लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार धाडी गावातून समोर आला आहे. राकेश पाटील नामक भामट्याने वरूड (जि.अमरावती) येथील फाइन केअर बँकेचे नाव सांगत, आम्ही अधिकृत प्रतिनिधी असून, बचतगटाच्या महिलांना दुसऱ्याच दिवशी एक लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो, असे आमिष दिले.
20 पेक्षा अधिक महिलांकडून तीन पासपोर्ट, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्ससह विविध कागदपत्रे नगदी 4350 रुपये घेतले. दुसऱ्या दिवशी महिलांना बँकेत येण्याचा सल्ला भामट्यांनी दिल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील फाइन केअर नामक बँकेत बचतगटाच्या महिला गेल्या, तेव्हा त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. बँक प्रतिनिधींना महिलांनी वर्णन केल्याप्रमाणे राकेश पाटील व इतर एक असा कोणताही बँकेचा प्रतिनिधी नाही, असे सांगितल्याने बचतगटाच्या महिलांमध्ये एकच खळबळ उडाली. साहूर, सत्तारपूर, माणिकवाडा, वरूड तालुक्यातील रोशनखेडा, पेठ मांगरुळी येथील महिलांची फसवणूक केल्याचे पुढे आले.