आधी कॉम्प्रेसर फुटले नंतर सिलिंडरचा स्फोट!उपहारगृह मालकाचे लाखोंचे नुकसान; वर्ध्याच्या रामनगर परिसरातील घटनेने खळबळ

वर्धा : वेळ सकाळी ८.४५ वाजताची अचानक बॉम्ब फुटल्यासारखा आवाज आला अन् नागरिकांची तारांबळ उडाली. मग काय उपहारगृहातून आगीचे लोळ उठू लागले आग विझविण्यासाठी धडपड सुरु झाली. पाण्याचा मारा करण्यात आला. अखेर अर्धा तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. पण त्याच वेळेस उपहारगृहातील फ्रिजचे कॉम्प्रेसर फुटले त्यानंतर सिलिंडरचा स्फोट झाला. ही घटना रामनगर परिसरातील संत तुकाराम वॉर्ड लेप्रसी फाऊंडेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. यात उपहारगृह मालकाचे लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

शहरातील रामनगर परिसरातील संततुकाराम वॉर्ड परिसरात रणजित इंगळे यांच्या मालकीचे ‘लक्ष्मी कॅफे’ नामक उपहारगृह आहे. शनिवारी २५ रोजी उपहारागृह बंद होते. सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास उपहारगृहातून जोरदार आवाज आला आणि अचानक बंद दुकानातून धूर अन् आगिचे लोळ निघू लागले. दरम्यान उपहारगृह मालक रणजित इंगळेसह विक्की चांभारे, सागर कठाणे, अनंता कठाणे यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान आगीच्या आसीने तिघेही किरकोळ भाजले.

अखेर अग्निशमन विभागाच्या बंबाच्या मदतीने आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला. लागलेल्या आगीत उपहारगृहातील साहित्याची राखरांगोळी झाली. यात उपहारगृह मालक रणजित इंगळे यांचे लाखोंचे नुकसान झाले. ही घटना शॉर्टसर्किटने झाल्याचा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिकांसह महेश तेलरांधे, पवन राऊत आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here