बनावट सोने विकणाऱ्यांनी खरेदीदारांस मारहाण करून लुटले! तिघांना अटक; सात लाखांत किलोभर सोने देण्याचा डाव फसला

आष्टी (शहीद) : सात लाख रुपयांत एक किलो सोने देण्याची बतावणी करून विकत घेण्यासाठी आलेल्या खरेदीदारासह त्याच्या दोन मित्रांना मारहाण करून लुटण्यात आले. रोख रकमेसह मोबाइल घेऊन पोबारा आरोपींनी केल्यावर याप्रकरणी गुन्ह्याची नोंद घेण्यात आली. या प्रकरणातील तिघांना अटक करण्यात आली आहे.

आष्टी तालुक्‍यातील जामगाव येथील मूळ रहिवासी श्रीकृष्ण धुर्वे (४३) हा ऑटोरिक्षा चालक आहे. तो दहा वर्षांपासून धोटे ले-आऊट, जुनी अजनी, नागपूर येथे राहतो. श्रीकृष्णच्या मूळ गावी त्याची आई वास्तव्यास आहे. आरोपी आदित्य ब्राह्मणे (२४) आणि श्रीकृष्ण यांच्यात सहा महिन्यांपासून मैत्री होती. आदित्यने ४ मार्चला श्रीकृष्णला एक किलो सोने कमी दरात देणारी पार्टी असल्याचे सांगितले. शिवाय श्रीकृष्णने ते खरेदी करावे असा आग्रह धरला. त्यासाठी फोनवर संवादही झाला. त्यानंतर ठरल्याप्रमाणे श्रीकृष्ण हा ११ मार्चला नागपूर येथील मित्र इसराइल खान याला सोबत घेऊन साहूर येथे आला. याठिकाणी आदित्य याने देवेंद्र आणि त्याच्या दोन मित्रांसोबत ओळख करून दिली. तेव्हा आरोपींनी जवळ असलेल्या पिशवीतील सोनेरी शिक्का दाखवून सत्यता तपासण्यासाठी ते श्रीकृष्णला दिला. सोन्याची शुद्धता तपासल्यावर भाव ठरवू असे सांगत श्रीकृष्ण व त्याचा मित्र नागपूरला परतले. तपासणीदरम्यान सोनेरी शिक्का सोन्याचा असल्याची खात्री झाली.

दरम्यान, देवेंद्र याने आदित्य जवळून फिर्यादीचा नंबर घेत फिर्यादीला ७ लाख रुपयांत सोने देतो. त्यातील काही रक्‍कम साहूर या ठिकाणी द्यावी लागेल आणि उर्वरित रक्‍कम नागपूरला दिली तरी चालेल असे सांगितले. त्यानंतर श्रीकृष्ण हा १८ मार्चला दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास इसराइल खान व शेख सद्दाम यांना सोबत घेत एम. एच. ४९ बी. बी. ६६७० क्रमांकाच्या कारने साहूर गावाजवळील वळण रस्त्यावर आले. याच ठिकाणी लपून असलेल्या पाच ते सहा व्यक्‍तींनी श्रीकृष्ण व त्याच्या मित्रांवर हल्ला चढविला. शिवाय मारहाण करून रोख दोन लाख व तीन मोबाइल असा मुद्देमाल चोरून नेला. त्यानंतर याप्रकरणी श्रीकृष्ण यांनी आष्टी पोलिसांत तक्रार नोंदविली. पोलिसांनीही तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेत तपासाला गती देऊन आरोपी आदित्य ब्राह्मणे (२४), आकाश भोसले (२६), सच्याई सोळंकी (२३) यांना अटक केली. ही कारवाई ठाणेदार लक्ष्मण लोकरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अमित जुवारे, अनिल देरकर, गजानन वडनेरकर, संजय बोकडे, बालाजी सांगळे, रोशन धाये यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here