
वर्धा : शहरालगतच्या ग्रामपंचायतींमध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे कचरा संकलनाचा प्रश्न गंभीर होत असताना, या समस्येवर उपाय म्हणून पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते १५ ई-घंटागाड्यांचे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषदेत आयोजित कार्यक्रमात या वाहनांचे वितरण करण्यात आले असून, यामुळे ग्रामपंचायतींमधील स्वच्छता व्यवस्थेला मोठा हातभार लागणार आहे.
गेल्या काही वर्षांत शहरालगतच्या गावांची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. परिणामी कचरा संकलनाचे प्रमाण वाढले असून, उपलब्ध वाहनांची संख्या अपुरी पडत होती. यामुळे दैनंदिन कचरा व्यवस्थापनात अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या जनसुविधा निधीतून १५ घंटागाड्या खरेदी करून संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या. या वेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले यांच्यासह शहरालगतच्या ग्रामपंचायतींचे सरपंच, माजी सरपंच, सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले की, वाढत्या लोकसंख्येमुळे कचरा व्यवस्थापनाचा ताण वाढला आहे. घंटागाड्यांच्या माध्यमातून नियमित कचरा संकलन सुलभ होईल आणि ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता राखण्यास मदत होईल. वर्धा शहरालगतच्या पिपरी मेघे, उमरी मेघे, नालवाडी, बोरगाव मेघे, सालोड हिरापूर, सावंगी मेघे, म्हसाळा, पवनार, साटोडा, सिंदी मेघे, वरुड, घोराड, केळझर, येळाकेळी आणि नटाळा पुनर्वसन या ग्रामपंचायतींना या ई-घंटागाड्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

























































