Home Breaking News समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! भरधाव ट्रकने महिला मजुरांना चिरडलं; ६ जणींचा जागीच...

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! भरधाव ट्रकने महिला मजुरांना चिरडलं; ६ जणींचा जागीच मृत्यू

जालना : जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर कडवंची शिवारात भीषण अपघात घडला. भरधाव ट्रकने महामार्गावर काम करणाऱ्या महिला मजुरांना चिरडल्याने ६ महिलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरहून मुंबईकडे वेगाने धावणाऱ्या ट्रकने समृद्धी महामार्गावर काम सुरू असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या महिला मजुरांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की सर्व महिला ट्रकच्या चाकाखाली चिरडल्या गेल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी रक्ताचा सडा पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.

घटनेची माहिती मिळताच जालना तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृत महिलांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील कामगारांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात येत आहेत का, याचा तपासही पोलिसांकडून केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!