
वर्धा : बेवारस कुत्र्यांच्या भांडणात गंभीर जखमी झालेल्या अवघ्या दोन महिन्यांच्या पिल्ल्यावर वर्ध्यातील डॉग क्लिनिकमध्ये अत्यंत जटिल व जीवघेणी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे एका निराधार पिल्ल्याला अक्षरशः नवजीवन मिळाले आहे. सदर पिल्ल्याला जखमी अवस्थेत समीक्षा राऊत यांनी उपचारासाठी क्लिनिकमध्ये दाखल केले. तपासणीत पिल्ल्याचा छाती व पोट यांना विभक्त करणारा महत्त्वाचा पडदा (डायाफ्राम) फाटल्याचे निदान झाले. या गंभीर अवस्थेला ‘ट्रॉमॅटिक डायाफ्रामॅटिक हर्निया’ असे संबोधले जाते.
या दुखापतीमुळे पोटातील अवयव छातीच्या पोकळीत सरकले होते, परिणामी फुफ्फुसांवर प्रचंड दाब येऊन पिल्ल्याला श्वास घेणे अत्यंत कठीण झाले होते. उपचारासाठी आणल्यावेळी त्याचे SpO₂ केवळ ६२ इतके धोकादायकरीत्या कमी होते. पिल्ल्याची गंभीर अवस्था लक्षात घेऊन तातडीने व्हेंटिलेटर सपोर्ट देण्यात आला. इतक्या लहान वयाच्या पिल्ल्यावर भूल देणे, श्वसन नियंत्रित ठेवणे आणि शस्त्रक्रिया पार पाडणे हे अत्यंत आव्हानात्मक ठरले. शस्त्रक्रियेदरम्यान छातीमध्ये गेलेले अवयव काळजीपूर्वक मूळ स्थितीत आणण्यात आले आणि फाटलेला डायाफ्राम यशस्वीरित्या शिवण्यात आला. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान श्वसनावर काटेकोर नियंत्रण ठेवण्यात आले.
शस्त्रक्रियेनंतर पिल्ल्याच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून आली असून त्याचे SpO₂ ८५ पर्यंत वाढले आहे. सध्या पिल्ल्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. ही जटिल शस्त्रक्रिया डॉ. संदीप जोगे व त्यांच्या टीमने यशस्वीरित्या पूर्ण केली. यावेळी डॉ. उपाध्ये व डॉ. पियुष दुबे यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले. विदर्भात अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया अत्यंत कमी प्रमाणात होत असल्याने ही कामगिरी पशुवैद्यकीय क्षेत्रासाठी अभिमानास्पद मानली जात आहे. या यशामुळे भविष्यात अशा गंभीर प्रकरणांवर स्थानिक पातळीवर उपचार करण्याचा आत्मविश्वास वाढणार आहे.























































