Home ◼️ संपादकीय आम्हीही साक्षर! वर्ध्यात १,५९२ आजी-आप्पांची परीक्षा ; साक्षरतेकडे भक्कम पाऊल

आम्हीही साक्षर! वर्ध्यात १,५९२ आजी-आप्पांची परीक्षा ; साक्षरतेकडे भक्कम पाऊल

वर्धा : केंद्र शासन पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत वर्धा जिल्ह्यात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी उत्साहात पार पडली. विशेष म्हणजे, तब्बल १,५९२ असाक्षर आजी-आप्पांनी “आम्हीही साक्षर” म्हणत परीक्षा देत साक्षरतेकडे पहिले ठोस पाऊल टाकले. केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमानाने राबविण्यात येत असलेल्या या अभियानाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यासाठी १,५३८ नवसाक्षरांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात १,५९२ जणांनी परीक्षा देत उद्दिष्टालाच मागे टाकले, अशी माहिती शिक्षणाधिकारी (योजना) चंद्रकांत चिलवंते यांनी दिली. एकूण १,६०१ जणांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १,५९२ जण प्रत्यक्ष परीक्षेला उपस्थित राहिले.

जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील तब्बल ९४१ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत परीक्षार्थ्यांच्या सोयीनुसार तीन तासांची परीक्षा झाली. वाचन, लेखन आणि संख्याज्ञान या तीन मूलभूत घटकांवर आधारित प्रश्न विचारण्यात आले. अनेक केंद्रांवर परीक्षार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, तर एका दिव्यांग व्यक्तीने परीक्षा देत विशेष लक्ष वेधले. या अभियानात महिलांचा सहभाग विशेष लक्षणीय ठरला. परीक्षा देणाऱ्यांमध्ये १,१२२ महिला तर ४७० पुरुष होते. ग्रामीण भागात महिलांमध्ये साक्षरतेबाबत वाढत असलेली जागृती यावरून स्पष्ट होत असल्याचे मत व्यक्त होत आहे.

परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी जिल्हा व तालुका स्तरावर विशेष भरारी पथके नेमण्यात आली होती. पर्यवेक्षकांनी विविध केंद्रांना भेटी देऊन कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली. शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, स्वयंसेवक, शाळा व्यवस्थापन समित्या आणि नागरिक यांचे सहकार्य लाभले. तालुकानिहाय उपस्थितीत समुद्रपूर तालुका आघाडीवर असून येथे २९६ जणांनी परीक्षा दिली. त्यानंतर आर्वी २२१, देवळी २०१, कारंजा १९७, सेलू १९६, वर्धा व आष्टी प्रत्येकी १८१, तर हिंगणघाट येथे ११९ जणांनी सहभाग नोंदवला. वर्षानुवर्षे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आजी-आप्पांनी या परीक्षेद्वारे नव्या आयुष्याची दिशा पकडली आहे. “शिकण्याची इच्छा वयावर अवलंबून नसते” याचा प्रत्यय या उपक्रमातून पुन्हा एकदा आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!