तरुण-तरुणी ‘सैराट’, कुटुंबियांचा राडा! सिंदी(रेल्वे)त तणाव; शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त

वर्धा : तरुणीला गावातीलच एका तरुणाने फूस लावून पळवून नेल्याच्या संशयातून तरुणीच्या कुटुंबातील सदस्यांनी संशयित युवकाच्या घरी जाऊन चांगलाच राडा केला. ही घटना रविवारी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास घडल्याने सिंदी रेल्वे शहरात काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाला होता. मात्र, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी तत्काळ धाव घेत दोन्ही कुटुंबीयांची समजूत घातल्याने वातावरण निवळले.

या घटनेने सोमवारीदेखील शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. सिंदी रेल्वे शहरातील एका युवतीचे लग्न असल्याने ती खरेदी करण्यासाठी नागपूर येथे गेली ती परतलीच नाही. तिला गावातीलच एका युवकाने पळवून नेल्याच्या संशयातून तरुणीकडील मंडळी मुलाच्या घरावर चाल करून गेले. ही वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरताच पोलीस ठाण्यात नागरिकांची गर्दी जमली. यामुळे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

याची माहिती मिळताच पोलिसांनी तरुणाच्या घरी जात मुलीकडील मंडळींना समजाविण्याचा प्रयत्न केला, मात्र कुणीही ऐकत नसल्याने ठाणेदार चकाटे यांनी वरिष्ठांना याची माहिती दिली. डीवायएसपी पीयूष जगताप यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ सिंदी रेल्वे गावात जात तेथील परिस्थिती नियंत्रणात आणली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here