
वर्धा : पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती वर्धा व रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 26 ऑक्टोबर 2021 रोजी सेलसुरा या गावांमध्ये पशू चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये डॉक्टर गजानन आदमणे पशुधन पर्यवेक्षक (पशुवैद्यकीय दवाखाना) सालोड वर्धा तसेच डॉक्टर प्रदीप थुल सहाय्यक पशुधन विकास अधिकारी (पशुवैद्यकीय दवाखाना) तरोडा तसेच डॉक्टर रेणुका दिवाळे पशुधन विकास अधिकारी खरांगना (गोडे) तसेच नरेंद्र किटकुले (परिचर), साहेबराव भाकरे (परिचर) यांची उपस्थिती होती.
या वेळी डॉक्टर प्रदीप थुल यांनी पशुसंवर्धन विभागामार्फत ज्या योजना आहेत त्या योजनां बद्दल सविस्तर असे मार्गदर्शन गावातील उपस्थित पशुपालकांना केले. सोबतच कॅम्प च्या दरम्यान जनावरांची चिकित्सा केली. त्यामध्ये 15 गाईची गर्भधारणा तपासणी तसेच 200 शेळ्या, बैल, गाई यांना विविध प्रकारचे लसीकरण तसेच तपासण्या या दरम्यान करण्यात आल्या.
दरम्यान ज्या पशुपालकांनी आपले अडचणी या ठिकाणी मांडले त्या सर्व प्रश्नांचे निराकरण डॉक्टर प्रदीप थुल यांनी केले. पशुचिकित्सा शिबिरामध्ये एकूण दोनशेच्या आसपास जनावरांची तपासणी, लसीकरण व औषधोपचार करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता श्री. प्रफुल बनसोड रिलायन्स फाउंडेशन, नितीन ठाकरे रिलायन्स फाऊंडेशन तसेच गावातील पशुसखी कल्पना म्हैसगवळी यांनी मोलाचे सहकार्य केले.