
वर्धा : महिलांनी समाज काय म्हणेल याचा अति विचार न करता स्वतःच्या मर्यादित प्रतिमेतून बाहेर पडणे आवश्यक आहे. सुरक्षित वाटणाऱ्या चौकटी अनेकदा बंधनांचे कवच ठरतात. त्या कवचातून बाहेर पडून स्वतःच्या विचारांवर आणि कर्तृत्वावर स्वतःची नवी ओळख निर्माण करण्याची तयारी महिलांनी ठेवली पाहिजे, असे मार्गदर्शन डॉ. धनंजय सोनटक्के यांनी केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वर्धा यांच्या वतीने महिला व मुलींसाठी आयोजित दोन दिवसीय ‘भरारी’ शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरलीधर बेलखोडे होते.
अध्यक्षीय भाषणात बेलखोडे यांनी, समाजरचनेत महिला व युवतींची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी महिलांनी समर्थपणे पार पाडू शकते. पर्यावरण चांगले राहिल्यास कौटुंबिक व सामाजिक वातावरणही सुदृढ राहते, असा संदेश त्यांनी दिला. हे ‘भरारी’ शिबिराचे चौथे वर्ष असून दरवर्षी महिला व युवतींसाठी याचे आयोजन केले जाते. शिबिरामध्ये सहभागींसाठी उत्साहवर्धक व सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात आले होते. विविध खेळ, प्रेरणादायी सत्रे, सामान्यांमधील असामान्य व्यक्तींच्या मुलाखती, केस स्टडीज यांद्वारे जीवनकौशल्ये, वास्तवाचा सामना आणि सकारात्मक विचार यावर मंथन करण्यात आले.
‘जगू या आनंदे’, ‘मुझे मुझ पर नाज है’ अशा उपक्रमांबरोबरच कॅटवॉकद्वारे परिचय सत्र, प्रेरणादायी माहितीपट आदी कार्यक्रमांमुळे शिबिर अधिक आकर्षक ठरले. यंदाच्या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे सासू-सुनेची एक जोडी सहभागी झाली होती. याशिवाय मागील वर्षीच्या शिबिरार्थींनी आपल्या नातेवाईक व मैत्रिणींनाही सहभागी करून घेतल्याने शिबिराची उपयुक्तता अधोरेखित झाली.
यावर्षी एकूण ३८ शिबिरार्थींनी सहभाग घेतला. शिबिरानंतर मनोगत व्यक्त करताना अनेकांनी दोन दिवस कोणत्याही ताणतणावाशिवाय ‘माहेरी आल्यासारखा’ अनुभव मिळाल्याचे सांगितले. काहींनी आपल्या भावना व्यक्त करताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली. मनात साचलेल्या गोष्टी व्यक्त करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळाले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
शिबिराच्या यशस्वी आयोजनात कविता राठोड यांची भूमिका महत्त्वाची ठरली. तसेच बेलखोडे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना सातव यांनी केले. प्रास्ताविक डॉ. माधुरी झाडे यांनी केले, पाहुण्यांचा परिचय प्राची काकडे यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन पूजा सावरकर यांनी केले. शिबिरादरम्यान अदिती हिने गीतगायन करून उत्साह टिकवून ठेवला. शिबिराच्या यशस्वितेसाठी सारिका डेहनकर, पंकजा गादेवार, प्रतिभा ठाकूर, कविता लोहट, मंजुषा देशमुख, आदिती धोपटे, द्वारकाताई इमडवार, कुंदा वैद्य, कल्पना सातव, प्रितेश म्हैसकर, अरुण भोसले आदींचे सहकार्य लाभले.




















































