

वर्धा : एकतर्फी प्रेमातून युवकाने सोशल मीडिया साईटवरून युवतीची बदनामी करून तिचा विनयभंग केला. तसेच माझ्याशी लग्न झाले नाही तर माझ्या मरणाला तीच कारणीभूत राहील, असा अजब प्रकार एकतर्फी प्रेमातून साहूर येथे उजेडात आला असून, याप्रकरणी आरोपी युवकाविरुद्ध २६ रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आष्टी पोलिसांनी दिली. २३ वर्षीय युवतीच्या नातेसंबंधातील ३० वर्षीय युवकाशी ओळख होती. मात्र, तो मागील दोन वर्षांपासून युवतीच्या मागे लग्नाची गळ घालत फिरत होता. यासंदर्भात युवतीच्या घरच्यांनीदेखील त्याला स्पष्ट नकार दिला होता.
युवतीचे अमरावती येथील एका युवकाशी लग्न जमले आणि साखरपुडा झाला असता ही बाब युवकाला समजताच त्याने फेसबुकवर युवतीने मला धोका दिला आहे, माझ्यासोबत प्रेम करून लग्न आता दुसऱ्याशी करीत आहे, जर मी मेलो तर माझ्या मरणाला तीच जबाबदार राहील, असा इंग्रजीत मजकूर सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर ४ एप्रिल रोजी आय लव्ह यू असा मेसेज पोस्ट केला. १० रोजी आरोपी युवक हा युवतीच्या घरी गेला आणि युवतीला त्रास देऊ लागला. घरच्यांनी त्याला समजावून सांगितले होते. मात्र, पुन्हा २६ रोजी त्याने सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर पोस्ट करून शेरोशायरी केल्याने अपमानित झालेल्या युवतीने अखेर आष्टी पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहेत.