विधानपरिषद नाराजी नाट्य : पंकजा मुंडेंनी केलेला अभ्यास मला जमला नाही-‘माजी मंत्री राम शिंदे

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विधान परिषदेच्या निवडणुकीत ऐनवेळी पत्ता कट केल्याने माजी मंत्री राम शिंदे यांनी पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उद्देशून त्यांनी ट्विट केले आहे. ‘उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी दोन दिवसांत चांगला अभ्यास केल्याने रमेश कराड यांना उमेदवारी मिळाली. त्यांनी जो अभ्यास केला, तो मला जमला नाही,’ अशा उपरोधिक भाषेत त्यांनी मनातील खदखद व्यक्त केली आहे. त्यामुळे भाजपातील अंतर्गत धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.
विधान परिषदेवर वर्णी लावण्यासाठी शिंदे हे आग्रही होते. भाजपमधील एका गटाने शिंदे यांची विधानपरिषदेवर वर्णी लावून घेण्यासाठी ‘लॉबिंग’ केले होते.मात्र, त्यांचा पत्ता कट झाला. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनाही उमेदवारी नाकारल्यानंतरच त्यांच्यासह समर्थकांनी नाराजी व्यक्त केली होती. मुंडे यांच्या नाराजीनंतर दोनच दिवसांत पक्षाला निर्णय बदलावा लागला. गोपछडे यांची उमेदवारी नाकारून मुंडे समर्थक असलेल्या रमेश कराड यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर शिंदे यांनीही माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा आधार देऊन भाजप श्रेष्ठींवर नाराजी व्यक्त केली आहे.

शिंदे यांनी स्वतःच्या ‘ट्विटर’ व ‘फेसबुक’च्या अधिकृत खात्यावर पोस्ट टाकली आहे. ‘विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेसाठी नेते, इच्छुक उमेदवार समजून घेतील आणि शिकतील, असे म्हटले होते. त्याअनुषंगाने पंकजा मुंडे यांनी दोन दिवसांत चांगला अभ्यास केला. त्यामुळे रमेश कराड यांना उमेदवारी मिळाली. पंकजा मुंडे यांना जो अभ्यास केला तो मला व इतरांना जमला नाही’, अशा आशयाची पोस्ट त्यांनी टाकली आहे.

मुंडे यांनी ज्या पद्धतीने विधान परिषदेच्या उमेदवारी न मिळाल्याने समर्थकांमार्फत सोशल मीडियाचा वापर करून दबावतंत्र वापरले. त्या दबावतंत्रामुळे भाजप श्रेष्ठींनी गोपछडे यांची उमेदवारी नाकारून मुंडे समर्थक कराड यांना उमेदवारी दिली आहे. दोन दिवसांत मुंडेंनी योग्य पद्धतीने उपद्रवमूल्य दाखविल्याने श्रेष्ठींना नमते घ्यावे लागले. त्या पद्धतीचे उपद्रवमूल्य दाखविता आले नाही, असा मेसेज देऊन शिंदे यांनी पश्रश्रेष्ठींबद्दलची नाराजी व्यक्त केली आहे.

शिंदे भाजपचे निष्ठावंत व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्‍वासू मानले जातात. अशा परिस्थितीत त्यांचा नाराजीचा सूर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. पराभवानंतर त्यांनी भाजपात नव्याने दाखल झालेल्या आमदार राधाकृष्ण विखे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. विखे घराण्यांमुळेच निवडणुकीत पराभव झाला, असा आरोप केला होता. शिंदे यांच्यासह भाजप आमदार मोनिका राजळे, पराभूत उमेदवार माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे व इतर पदाधिकार्‍यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे विखे यांची तक्रार केली होती. विधानपरिषदेवर वर्णी न लागल्याने माजी मंत्री शिंदे यांच्या राजकीय वाटचालीला ब्रेक लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here