कोरोना गेल्यानंतर काँग्रेसवर संकट, तीन मोठे नेते पक्ष सोडणार; चंद्रकांत पाटील यांचा खळबळजनक दावा

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विधान परिषदेची उमेदवारी नाकारण्यात आल्यानं भाजपावर नाराज असलेल्या एकनाथ खडसेंनी पक्षावर जोरदार निशाणा साधला. यानंतर आता खडसेंच्या आरोपांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्तुतर दिलं आहे. खडसेंना गळाला लावायचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसचा पाटील यांनी समाचार घेतला. काँग्रेसला राज्यासह देशात कोणतंही भवितव्य नाही.कोरोनाचं संकट दूर झाल्यानंतर काँग्रेसचे तीन बडे नेते पक्ष सोडणार असल्याचा खळबळजनक दावा पाटील यांनी केला आहे.
विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यानं भाजपावर नाराज असलेल्या एकनाथ खडसेंना स्वत:कडे खेचण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. खडसे काँग्रेसमध्ये आले, तर त्यांचं स्वागतच आहे, असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले होते. त्यावर थोरात यांनी आधी स्वत:चा पक्ष सांभाळावा, असा खोचक सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला. तुम्ही राजघराणातल्या ज्योतिरादित्य सिंधियांना सांभाळू शकला नाहीत, याची आठवण त्यांनी करून दिली.
कोरोनाचं संकट दूर झाल्यानंतर काँग्रेसचे तीन मोठे नेते पक्ष सोडणार असल्याचा खळबळजनक दावा पाटील यांनी केला. दोन तरुण आणि एक वरिष्ठ नेता काँग्रेसला रामराम करणार असल्याचं पाटील म्हणाले. मात्र अज्ञानात सुख असतं असं म्हणत त्यांनी यावर अधिक बोलणं टाळलं. काँग्रेस राज्यातल्या सरकारमध्ये आहे. मात्र कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पक्ष कुठेच दिसत नाही. केवळ आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधतात. त्यातही टोपे सध्या बोलतच नाहीत, तर मुख्यमंत्री फक्त घरूनच बोलतात. या सगळ्यात काँग्रेस कुठे आहे, असा सवाल पाटील यांनी विचारला.
विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी काँग्रेस आग्रही होती. मात्र उद्धव ठाकरेंनी दम देताच काँग्रेसनं लगेच एक जागा सोडली. विधान परिषद निवडणुकीत दुसरी जागा मिळवू न शकणारा पक्ष खडसेंना काय देणार, असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला. कोरोनाचं संकट गेल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठे भूकंप होणार आहेत. देशात तीन, तर राज्यात असंख्य भूकंप होणार आहेत. थोरात यांनी यावर काम करावं, असं पाटील म्हणाले. खडसेंना सांभाळणं सोपं नसल्याचंदेखील पाटील यांनी म्हटलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here