दारु भरलेल्या वाहनाने दिली पोलिसांच्या खासगी वाहनाला धडक! तीन कर्मचारी जखमी

वर्धा : दारुभरलेल्या वाहनाचा पाठलाग करताना दारुविक्रेत्यांनी थेट पोलिसांच्या खासगी वाहनालाच धडक दिली. पोलिसांचे खासगी वाहन पुलाच्या कठड्याला आदळून उलटले. यामध्ये तीन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले. पोलिस कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना सावंगी पोलिसांनी २० रोजी पहाटेच्या सुमारास अटक केली. ही घटना १९ रोजी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास येळाकेळी नजीकच्या धाम नदीच्या पुलावर घडली. मोनू विश्वकर्मा, योगेश पेटकर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

अमरावती जिल्ह्यातील राजू जैस्वाल याच्या बारमधून वर्धा जिल्ह्यात दारु येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिस कर्मचारी प्रदीप पुरुषोत्तम वाघ यांच्यासह इतर दोन पोलिस अंमलदार हे त्यांच्या एम.एच.३२ वाय. ५१०७ क्रमांकाच्या खासगी कारने दारु भरलेल्या एम.एच. ४३ पी.व्ही. ५०६६ क्रमांकाच्या कारचा पाठलाग करीत होते. पोलिसांनी कारचालकास थांबण्याचा इशारा केला. पण, कारमधील आरोपींनी ‘जो करणा है कर हम रुकेंगे नही’ असे म्हणत कार सुसाट पळविली.

पोलिस खासगी वाहनाने पाठलाग करीत असतानाच येळाकेळी येथील धाम नदीच्या पुलावर अचानक दारुविक्रेत्यांनी कार पोलिसांच्या वाहनासमोर आडवी लावली आणि पोलिसांच्या वाहनाला समोरुन धडक मारत काही दूरपर्यंत घासत नेली. पोलिसांचे खासगी वाहन पुलाच्या कठड्याला धडकून पलटी झाले. या घटनेत तीन पोलिस अंमलदार गंभीर जखमी झाले. शासकीय कामात अडथळा निर्माण करुन पोलिस अंमलदारांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सावंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी २० रोजी पहाटेच्या सुमारास आरोपी मोनू विश्वकर्मा आणि योगेश पेटकर यांना अटक करीत कार जप्त केली. जखमी पोलिसांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here