डोक्यावरून बसचे चाक गेल्याने व्यक्तीचा मृत्यू! वर्ध्यातील दयालनगर येथील अपघात

वर्धा : अपघातात रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीच्या डोक्यावरुन बसचे समोरील चाक गेल्याने व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात वर्धा ते यवतमाळ रस्त्यावर असलेल्या दयालनगर परिसरात झाला. राकेश विधानी (३८) रा. दयालनगर असे मृतकाचे नाव आहे.

राकेश विधानी हे (एम.एच.३२ ए.यू. ७५९१) क्रमांकाच्या दुचाकीने घरी जात असताना त्यांच्या दुचाकीला (एम.एच. ३२ टी. ७३०३) क्रमांकाच्या उभ्या ऑटोचा कट लागला. दरम्यान ते दुचाकीवरुन रस्त्यावर पडले. तेवढ्यातच वर्ध्याकडून यवतमाळकड़े भारधाव जाणाऱ्या (एम.एच.१३ सीयु. ६७२७) क्रमांकाच्या बसचालकाने निष्काळजीपणे बस चालविल्याने बसचे समोरील चाक राकेशच्या डोक्यावरून गेले.

या अपघातात राकेश विधानी हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ सावंगी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सागर विधानी यांनी शहर पोलीस ठाण्यात बसचालकाविरुद्ध तक्रार दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here