तरुणीवर प्रेमसंबंधातून अत्याचार! दुसर्‍या युवतीशी लग्न; आरोपीला अटक

सेलू : आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या एका 19 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना तालुक्‍यातील सिंदी (रेल्वे) येथे उघडकीस आली आहे. प्रशांत रमेश खैरे (25) रा. सिंदी (रेल्वे) असे आरोपीचे नाव आहे. त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न केल्याने ही घटना उघडकीस आली. त्याच्या लग्नाचा स्वागत समारंभ रविवारी रात्री सुरू असतानाच पोलिसांनी त्याला अटक केली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आरोपी प्रशांत खैरे व ही तरुणी शेतमजुरीचे काम करतात. दोघेही एकत्र कामास जात होते. पीडित मुलीला आई-वडील नाही. आरोपीने मुलीला आपल्या जाळ्यात ओढून तिचेशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले व तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर एक ते दीड वर्षापासून अत्याचार केला. तिच्याशी लग्न न करता त्याने भंडारा जिल्हातील एका गावातील मुलीसोबत गुपचूप लग्न उरकले. रविवारी त्याचा सिंदी (रेल्वे) येथे मंगळ कार्यालयात स्वागत समारंभाचा कार्यक्रम होता.

ही बाब त्या तरुणीला कळताच तिने आपल्या नातेवाइकांना सोबत घेत सिंदी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. रविवारी 6 फेब्रुवारीला लग्नाचा स्वागत समारंभ सुरू असताना ठाणेदार रवींद्र गायकवाड यांनी आरोपी प्रशांत खैरे याला अटक केली. त्याच्यावर बलात्कार व पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक फुकट करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here