ग्रामपंचायत सदस्यास अतिक्रमण करणे भोवले! जिल्हाधिकार्‍यांनी घोषित केले अपात्र

कारंजा (घाडगे) : तालुक्‍यातील जऊरवाडा (खैरी) येथील ग्रामपंचायत सदस्य रोशन कुमरे यांच्यावर शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. हा आदेश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी निर्गमित केला. विशेष म्हणजे मागील १५ दिवसांत जऊरवाडा ग्रामपंचायतीतील तब्बल दोन सदस्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे.

कारंजा तालुक्यातील जऊरवाडा (खैरी) ग्रामपंचायतीचे सदस्य रोशन कुमरे यांनी कार नदी धरणाचे वसाहतीकरिता संपादित केलेल्या जमिनीवर अतिक्रमण करून घर बांधले. त्यामुळे हा प्रकार शासकीय जमिनीवर अतिक्रमण करणारा असल्याचा आरोप करीत त्यांचे सदस्यत्व रदद करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल करण्यात आली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद व पुरावे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी देशभ्रतार यांनी रोशन कुमरे यांना सदस्य पदावरून अपात्र घोषित केले आहे. विशेष म्हणजे १५ दिवसांपूर्वी याच ग्रामपंचायतीचे सदस्य एकनाथ माहोरीया यांच्यावर कराचा भरणा वेळेत न भरल्याचा ठपका ठेवून त्यांना अपात्र घोषित करण्यात आले होते. या ग्रा.पं. त एकूण सहा सदस्य होते. आता ही संख्या पाच झाली. सार्वत्रिक निवडणुकीत खैरी (पु) वॉर्डातील नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे एक पद रिक्त होते. काही महिन्यांपूर्वी रिक्‍त पदासाठी निवडणूक झाल्यावर रोशन कुमरे निवडून आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here