कत्तलीसाठी नेणाऱ्या सहा जनावरांची केली सुटका! वाहनासह १.६९ लाखांचा मुद्देमाल जप्त

तळेगाव (श्या.पंत.) : निर्दयीपणे मालवाहू गाडीत जनावरांना कोंबून कत्तलीसाठी नेले जात असल्याची माहिती मिळताच बजरंग दलाच्या स्वयंसेवकांच्या मदतीने स्थानिक पोलिसांनी धडक कारवाई करून तब्बल सहा जनावरांची सुटका केली. ही कारवाई रविवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास नागपूर अमरावती महामार्गावर आष्टी टी-पोंईट परिसरात करण्यात आली.

एका मालवाहू गाडीत जनावरांना कोंबून कत्तलीसाठी नेले जात असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ही माहिती तातडीने पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी आष्टी टी पॉईट भागात नाकेबंदी करून काही वाहनांची तपासणी केली. दरम्यान तळेगावच्या दिशेने जात असलेल्या मालवाहूला (क्र. एमएच ३२ क्यू ३६४२) अडवून पाहणी केली असता त्यात चार गायी व दोन गोऱ्हे असे एकूण सहा जनावरे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी वाहनातील दोघांना ताब्यात घेत जनावरांच्या वाहतुकीसंदर्भातील परवान्याबाबत विचारणा केली. त्यांच्याकडे कुठलाही परवाना नसल्याचे पुढे आल्याने पोलिसांनी मालवाहू तसेच सहा जनावरे असा एकूण १ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. जनावरांना संत लहानूजी महाराज देवस्थान टाकरखेड येथील गोशाळेत ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली असून, पढील तपास सरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here