आंजीसह वर्ध्यातील महसूल मंडळाने नाकारला सोयाबीनचा पीकविमा! पाच वर्षांच्या सरासरीचे लावले निकष; विमाधारक शेतकऱ्यांमध्ये रोष

पवनार : वर्धा तालुक्‍यातील आंजी आणि वर्धा महसूल मंडळातील सोयाबीन पीकविमाधारक शेतकऱ्यांना पीकविमा नाकारला असून पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत उत्पन्न कमी झाले नसल्याचे कारण महसूल विभागाने पुढे केले आहे. त्यामुळे विमाधारक शेतकऱ्यांमध्ये रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावर्षी निकृष्ट बियाणे, पावसामुळे झालेली दुबार, तिबार पेरणी व शेवटी खोड माशी व बुर्शीने केलेल्या आक्रमणामुळे उत्पन्न खूप कमी झाले. तरीसुद्धा उंबरठा उत्पत्न हे वर्धा महसूल मंडळासाठी प्रति हेक्‍टर १०२८.५०० किलो व आंजी महसूल मंडळासाठी १०१२.३३३ किलो एवढे दाखविण्यात आले याचाच अर्थ ऐकरी किमान ४ क्विंटलच उतारा दाखविण्यात आला आहे.

प्रत्यक्षात एकरी एक क्विंटलसुद्धा पिकलेले नाही. महसूल मंडळात १० बाय ५ फूटचे दहा क्षेत्र निवडून त्याच्या उत्पनावरून सरासरी ठरविली जाते. या प्रात्यक्षिकेसाठी महसूल मंडळ, कृषी विभाग व विमा कंपनी संयुक्तरीत्या नियोजन करतात, परंतु, यामध्ये एकही शेतकरी प्रतिनिधी नसतो. त्यामुळे या प्रक्रियेवर शेतकरी शंका उपस्थित करतात.

शासन स्तरावर खोड माशीने झालेल्या नुकसानीचा अहवाल तयार करून त्यात मोठे नुकसान झाल्याचे दर्शविले असताना सुद्धा पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षीचे सरासरी उत्पन्न जास्त कसे, अशी शंका व्यक्त होत आहे. गतवर्षी हेच उत्पन्न आंजी महसूल मंडळात १४९२.७०० किलो व वर्धा महसूल मंडळात १६११.५०० किलो दर्शविले होते. गत वर्षीच्या तुलनेत ऐवढे कमी उत्पन्न असून, सुद्धा या महसूल मंडळात विमा कसा नाकारला याचा घोषवारा देण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here