गृहमंत्र्याच्या आदेशानंतर कारवाई नाहीच : शासकीय महसूल बुडत असला तरी जिल्हा प्रशासनातील अधिकारी सुस्तच आमदारांच्या होमटाऊनमध्ये वाळू माफियांचा डेरा

वर्धा : हिमाचल प्रदेशच्या माजी राज्यपाल माजी खा. दिवंगत प्रभा राव यांची कर्मभूमी असलेल्या देवळी तालुक्यातील रोहणी – कोल्हापूर भागात वाळू माफियांनी प्रचंड धुडगूस घातला आहे. वर्धा नदी पात्रातून दररोज अवैधरीत्या बोट आणि पोकलॅण्डच्या सहाय्याने दीडशे ते दोनशे टिप्पर वारेमाप वाळू उपसा केला जात आहे. काँग्रेसच्या विद्यमान आमदाराच्या रोहणी (वसू या गावात त्यांच्या बंगल्यापासून हाकेच्या अंतरावर हा सारा प्रकार सुरू असतानाही महसूल प्रशासनातील कोतवालापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सारीच यंत्रणा मूग गिळून असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील एकाही वाळू घाटाचा लिलाव झाला नाही ; पण रोहणी ( वसू ) या गावातून गेल्या महिना दीड महिन्यापासून अवैधरीत्या वाळू उपसा सुरू आहे नियमबाह्यरीत्या नदीपात्रात बोटी टाकण्यात आल्या असून पोकलॅण्डच्या सहाय्याने वाळू पात्राबाहेर काढली जात आहे.
दररोज सूर्य मावळतीला जाताच घाटावर वाळू माफियांची यात्रा भरायला सुरुवात होते ती पहाटे सूर्योदय होईपर्यंत सुरू राहत असल्याने रोहणी ते कोटेश्वर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ पाहायला मिळते. या जड वाहतुकीमुळे या मार्गाची पूर्णत : वाट लागली आहे चांगल्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, या वाळूमाफियांना राजाश्रय असल्याने कुणीही पुढे येत नाही. गेल्या दीड महिन्यांच्या कालावधीत रोहणी ( वसू ) या गावामध्ये ट्रॅक्टरचीही संख्या वाढली असून, गावातील ट्रॅक्टरही घाटावरून वाळू वाहतूक करीत आहेत. येथील वारेमाप वाळू उपस्यातून एका दिवसाला दहा ते बारा लाखांची उलाढाल होत असल्याचे बोलले जात आहे. याची तक्रार थेट पालकमंत्री सुनील केदार, गृहमंत्री अनिल देशमुख तसेच महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे गेल्याने त्यांनी महसूल पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागाला संयुक्त कारवाई करण्याचे आदेश दिले; पण राजाश्रयापुढे प्रशासनही हतबल असल्याचे दिसते.

सावंगी ( येंडे ) घाटावर मोर्चे बांधणी ?

जिल्ह्यात सध्या राजकीय मंडळीच वाळू घाटाच्या अवैध व्यवसायाला बळ देत असल्याचे दिसून येत आहे. रोहणीतील अवैध वाळू उपसा रोखण्याकरिता कारवाई करावी, अशी मागणी करणाऱ्या एका पक्षाच्या नेत्याने आता’ तुम्ही रोहणीचा घाट राखा, आम्ही सावंगी ( येडे ) चा घाट राखतो, अशी तडजोड केल्याची चर्चा आहे. त्यामुळे सावंगी (येंडे) च्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याला हाताशी धरून एका जिल्हा परिषद सदस्यासह या नेत्याने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. येत्या काही दिवसात आता सावंगीतूनही अवैध वाळू उपसा सुरू होण्याची शक्यता असून, जिल्हा प्रशासनाने तत्काळ पावले उचलण्याची गरज आहे.

जिल्हाधिकायांच्या धाकाने घाटातील बोटी व पोकलॅण्ड काढले बाहेर

घाटातून वारेमाप उपसा करण्यासाठी बोटी आणि पोकलॅण्ड नदीपात्रात उभे करण्यात आले आहे. रात्रभर वाळू उपसा होत असतानाही अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जात नाही. त्यामुळे वाळू माफियांचे चांगलेच फावते आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कोटेश्वर येथे देवदर्शनासाठी येणार असल्याची माहिती मिळताच वाळू माफियांनी कोटेश्वरलगत असलेल्या वाळू घाटातून पोकलण्ड आणि बोटी घाटाबाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविल्या. त्यामुळे घाटात वाळू उपसा होत नाही, असे चित्र निर्माण करण्यात आले. रात्री पुन्हा वाळूमाफियांनी घाटाकडे धाव घेऊन आपला गोरखधंदा सुरू केल्याचे सांगण्यात आले.

‘ऑन द स्पॉट’तडजोडीवर भर
देवळी तालुक्यातील अवैध वाळू उपसा सुरुवातीपासून चांगलाच चर्चेत आहे. तालुक्यातील शिरपूर, सोनेगाव बाई आणि आता रोहणी ( वसू ) या ठिकाणी लिलाव झाल्यागत वाळू उपसा सुरू असून, घाटावर महसूल, पोलीस आणि वन विभागाचे काही अधिकारी, कर्मचारी हजेरी लावतात ; पण कारवाई न करता’ ऑन द स्पॉट तडजोड करण्यावर भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी प्रति ट्रॅक्टर दहा हजार तर प्रति टिप्पर पंधरा हजार रुपये हप्ता बांधून घेतला आहे. ही अवस्था महसूल व वन विभागाची असून, महिना संपला की वाळू चोरट्यांना फोन केले जातात. त्यामुळे वाळू चोरीचा व्यवसाय चांगलाच फोफावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here