Home ◼️ संपादकीय वर्धा–यवतमाळ मार्गावर मृत्यूचा प्रवास ; दररोज अपघात, तरीही प्रशासन गप्प ! शहरांतर्गत...

वर्धा–यवतमाळ मार्गावर मृत्यूचा प्रवास ; दररोज अपघात, तरीही प्रशासन गप्प ! शहरांतर्गत मार्ग धोकादायक : सावंगी मेघे परिसरात वाहतूक कोंडी

वर्धा : शहरातून यवतमाळकडे जाणारा वर्धा–यवतमाळ मुख्य मार्ग सध्या वाहनचालकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत आहे. सावंगी मेघे येथील रुग्णालय, शाळा, महाविद्यालये व वसाहतींना जोडणारा हा मार्ग अत्यंत वर्दळीचा असूनही आजही तो एकपदरीच आहे. परिणामी या मार्गावर सातत्याने अपघात घडत असून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र आहे.

हा मार्ग वर्धा शहरात प्रवेश करणारा प्रमुख रस्ता आहे. याच रस्त्यावरून खासगी वाहने, दुचाकी, शालेय बस, रुग्णवाहिका तसेच जड वाहतूक मोठ्या प्रमाणात चालते. मात्र रस्त्याची रुंदी अपुरी असल्याने वाहनचालकांना ओव्हरटेक करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. समोरून येणाऱ्या वाहनांशी थेट धडक होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. विशेष म्हणजे सावंगी बायपास ते सलोट (हिरापूर) बायपास हा रस्ता शहराच्या आतून जाणारा महत्त्वाचा जोडमार्ग आहे. या मार्गावरून दररोज शाळा–महाविद्यालयांची वाहने, रुग्णवाहिका, खासगी वाहने तसेच जड वाहतूक मोठ्या प्रमाणात ये-जा करते. शहरातील वस्ती, व्यापारी संकुले आणि शिक्षण संस्था असल्याने हा मार्ग कायम वर्दळीचा असतो. मात्र इतका महत्त्वाचा असूनही हा रस्ता आजही एकपदरीच असल्याने येथे वाहतूक कोंडी व अपघात नित्याचे झाले आहेत.

अरुंद रस्त्यामुळे पुढे जाण्यासाठी ओव्हरटेक करणे अपरिहार्य ठरते. मात्र त्याच वेळी समोरून वाहन आल्यास अपघात अटळ ठरतो. अनेक अपघातांमध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी होत असून काही वेळा जीवितहानीही होत आहे. सावंगी मेघे येथील रुग्णालयात जिल्हाभरातून रुग्ण येतात. मात्र अरुंद रस्ता आणि सततची वाहतूक कोंडी यामुळे रुग्णवाहिका अनेकदा अडकतात. वेळेत उपचार न मिळाल्यास रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रशासनाची उदासीनता…

वारंवार अपघात होऊनही संबंधित विभाग व प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. ना रस्त्याचे रुंदीकरण, ना डिव्हायडर, ना स्पष्ट सूचना फलक सर्वच बाबतीत प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

चौपदरीकरणाची जोरदार मागणी…

वर्धा–यवतमाळ मार्गासह सावंगी बायपास ते सलोट (हिरापूर) बायपास या शहरांतर्गत वर्दळीच्या मार्गाचे तात्काळ चौपदरीकरण करावे, अपघातप्रवण ठिकाणी सिग्नल, गतिरोधक व प्रकाश व्यवस्था उभारावी, तसेच जड वाहतुकीसाठी स्वतंत्र नियोजन करावे, अशी जोरदार मागणी नागरिक, वाहनचालक व सामाजिक संघटनांकडून केली जात आहे. अपघात घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल उपस्थित होत असून, हा मार्ग वेळीच सुरक्षित न झाल्यास भविष्यात मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.

प्रतिक्रिया….

वर्धा–यवतमाळ मार्गावरून दररोज प्रवास करावा लागतो. अरुंद रस्त्यामुळे प्रत्येक प्रवास जीव मुठीत धरून करावा लागतो. समोरून वाहन येईल की नाही, याचा अंदाजच लागत नाही. रात्री तर परिस्थिती अधिक धोकादायक होते. प्रशासनाने तातडीने रस्ता रुंद करणे गरजेचे आहे.

रतिश सवाई, सामाजिक कार्यकर्ता वर्धा

हा मार्ग रुग्णालय, शाळा आणि शहराला जोडणारा मुख्य रस्ता आहे. तरीही सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना दिसत नाहीत. अपघात झाल्यावर चौकशी होते, पण उपाय होत नाहीत. चौपदरीकरण, डिव्हायडर आणि सिग्नलची तातडीची गरज आहे. नाहीतर हा रस्ता आणखी जीव घेईल.

अल्पेश नगराळे, सामाजिक कार्यकर्ता बरबडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!