
कारंजा (घा.) : गुरुपौर्णिमेला मद्यधुंद अवस्थेत घरी परतलेल्या विनोद भीमराव बारंगे (२७) याने आईशी वाद केला. हीच बाब विनोदचा भाऊ तुकाराम बारंगे (३०) याला खटकल्याने त्याने विनोदला समजाविण्याचा प्रयत्न केला. पण बघता-बघता वाद विकोपाला गेला. दरम्यान तुकाराम याने विनोद याला कुऱ्हाडीने मारहाण करून त्याची हत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास तालुक्यातील एकाअर्जुन या गावात घडली.
पोलीस सूत्रानुसार, एकाअर्जुन येथील विनोद बारंगे हा मिस्त्री काम करायचा. मागील १५ दिवसांपासून तो गावाबाहेरच होता. पण गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून तो शुक्रवारी घरी परतला. सणाचे औचित्य साधून लहान मुलगा घरी परतल्याने विनोदच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत घरी परतलेल्या विनोदने त्याच्या आईसोबत क्षुल्लक कारणावरून वाद केला.
मद्यधुंद अवस्थेतील विनोद आईला शिवीगाळ करीत असल्याने विनोदचा मोठा भाऊ तुकाराम याने त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तुकाराम तसेच विनोद यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. याच भांडणादरम्यान तुकाराम याने कुऱ्हाडीने विनोदला मारहाण केली. यात विनोद याचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून मृतदेह. उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.
या प्रकरणी कारंजा पोलीस ठाण्यात मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कारंजा पोलीस करीत आहेत.