

नाचणगाव : येथील नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. उन्हाळ्याच्या झळा वाढू लागल्या असतानाच गावात पिण्याच्या पाण्याचा घोर तुटवडा जाणवत असून, ग्रामपंचायतीकडून होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. पाच ते सहा महिन्यांपासून आठवड्यातून दोन वेळा होणारा पाणीपुरवठा आता दहा-बारा दिवसांवर गेला आहे. ही गंभीर समस्या प्रशासनाच्या आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
आज सकाळी विनोद गावंडे यांच्या नेतृत्वात गावातील महिलांनी घागर डोक्यावर घेऊन मोठ्या संख्येने ग्रामपंचायत कार्यालयाकडे मोर्चा काढला. ‘पाणी आमचं हक्काचं’, ‘थेंब थेंबाला मोल आहे’, ‘आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका’ अशा घोषणा देत महिलांनी ग्रामपंचायत परिसर दणाणून सोडला. यावेळी ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरचा त्रास, राग आणि अपेक्षाभंग स्पष्ट दिसत होता. गावकऱ्यांनी एकमुखाने पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आणि ग्रामसेवकासमोर आपली व्यथा मांडली.
गेल्या अनेक दिवसापासून पाणीपुरवठा केवळ कागदावर सुरू आहे. प्रत्यक्षात काही घरांच्या पाण्याच्या टाक्या पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. सुरुवातीस आठवड्यातून दोनदा येणारं पाणी आता दहा-बारा दिवसांनी मिळतं, तेही अपुरं. या समस्येचा सामना करताना ग्रामस्थांना शेजारच्या गावांतून अथवा खासगी टँकरद्वारे पाणी विकत आणावं लागतंय. या सगळ्यामुळे केवळ आर्थिक नव्हे, तर मानसिक ताणही वाढत चालला आहे.
विनोद गावंडे, डॉ. प्रभाकर घोडेस्वार, दीपक सहरे, प्रशिक साखरे, दीपक सहारे, मयुर मेश्राम, रुपेश टेंभुर्णे, जे. पी. सहारे, संजय घोडेस्वार, दिलीप कारवडे, शैलेश जांभुळकर, अविनाश नागराळे, सौरभ आंबेडकर, सतीश सहारे, सतीश भटकर, विरू सहारे, अमन संगोळे, सुभाष ढाक – यांच्यासह महिलांमधून रामाबाई साखरे, नूतन सहारे, सुलोचना टेंभुर्णे, प्रज्ञा कारवडे, सत्यभामा सहारे, संगीता मेश्राम, रत्नमाला दरवाडे, प्रभावाई घोडेस्वार, रेखा ढाक व वीजूबाई जांभुळकर यांनी ग्रामसेवक व प्रशासनाकडे सामूहिक निवेदन सादर केलं.
प्रतिक्रिया…..
गावातील पाण्याची समस्या ही पूर्णतः प्रशासक व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे निर्माण झालेली आहे. ही समस्या लवकरात लवकर सोडवली गेली नाही, तर याचे तीव्र पडसाद उमटतील. आम्ही ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन आणि उपोषणाला बसणार आहोत. ही आमच्या जगण्याच्या हक्काची लढाई आहे.
विनोद गावंडे, माजी ग्रामपंचायत सदस्य नाचणगाव
जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या वितरण विभागाकडून अनियमित पाणीपुरवठा आम्हाला केल्या जात आहे. या विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे हा सगळा प्रकार चालू आहे आम्ही वारंवार याबाबत जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागालां माहिती दिली मात्र त्यांच्याकडून कोणताही ठोस उपाययोजना केली नसल्याने हा प्रकार घडत आहे मात्र ग्रामस्थांचा सर्व रोष आमच्या ग्रामपंचायत वर व्यक्त केल्या जात आहे.
संजय मोरे, ग्रामविकास अधिकारी नाचणगाव