
बुलडाणा : जिल्ह्यातील सिंदेखेडराजा तालुक्यातील तढेगावजवळ आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास टिप्परचा भीषण अपघात झाला. यामध्ये १५ ते २० मजूर प्रवास करत होते. त्यापैकी ९ ते १० मजुरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
नागपूर ते मुंबई यादरम्यान होऊ घातलेल्या समृद्धी महामार्गाचे काम झपाट्याने सुरू आहे. दरम्यान, आज सकाळी एक टिप्पर काही मजूर व त्यात लोखंडी सळई घेऊन काम सुरू असलेल्या दिशेने जात होते. यावेळी समोरून आलेल्या वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात वाहनावरील नियंत्रण सुटले. परिसरात दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. यातच अनियंत्रित टिप्पर रस्त्याच्या खाली उतरून पलटी झाले. यामध्ये असलेले मजूर दूरवर फेकल्या गेल्याचे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. जखमींवर उपचार करण्यासाठी तत्काळ जालना येथे हलविण्यात आले.

















































