सहा मार्गांवरील २३६ वीजखांबांना ३३२ फलकांचा वेढा! नगरपालिकेकडूनही कारवाईकडे कानाडोळा; वर्ध्यातील सौंदर्यीकरणात बाधा

वर्धा : शहराच्या सौंदर्यीकरणावर नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोट्यवधीचा खर्च करण्यात आला आहे. त्यातूनच मार्गाच्या दुभाजकांवर रेडियम लावलेले विद्युत खांब उभारण्यात आले. त्यावर आता प्रसिद्धी मिळविण्यासाठी अनधिकृतरित्या फलक वॉर सुरू असल्याने शहराच्या सौंदर्यीकरणाला बाधा निर्माण झाली आहे.

वर्ध्यातील सर्वच मार्गांचे सिमेंटिकरण आणि रूंदीकरण करण्यात आले असून या मार्गावरील दुभाजकांच्या सौंदर्यीकरणावरही भर दिला जात आहे. शहरातील आर्वी नाका ते पावडे चौक, आर्वी नाका ते कारला चौक, आर्वी नाका ते धुनीवाले चौक, शिवाजी चौक ते बजाज चौक आणि आंबेडकर चौक ते गांधी चौक या सहा मार्गांवरील दुभाजकातील जुने विद्युत खांब काढून त्या ठिकाणी नव्याने २३६ खांब लावण्यात आले.

या सर्व खांबांना रेडियम असल्याने रात्रीच्यावेळी ते रेडियम चमकतात. त्यामुळे या मार्गावरून जाताना वर्धेकरांना प्रसन्न वाटते. परंतु आता सर्वच खांबांवर अनधिकृतरित्या फलक लावण्यात आल्याने अल्पावधीतच विद्रुपीकरणात वाढ झाली आहे. एका खांबाला एक नाही तर तीन ते चार फलक लावलेले असून काही खांबांवर आहे, तर काही खाली लोंबकळत आहे. हवेच्या झोतात ते लोंबकळणारे फलक धावत्या वाहनावर येऊन अपघाताचीही शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नगरपालिकेने या अनधिकृत फलक वॉरला चाप लावण्यासाठी तात्काळ कारवाई करण्याची गरज वर्धेकरांकडून व्यक्त होत आहेत.

अखेर पालिकेनेही दिला कंत्राट

शहरातील रस्ता दुभाजकावरील पोलवर फलक लावण्यास मनाई केली जात असली तरीही वारंवार फलक लावले जात होते. त्यामुळे पालिकेने या फलकांतून उत्पादनात भर पडावी म्हणून फलक लावण्यासंदर्भात एका एजन्सीला कंत्राट दिले आहे. परंतु हा कंत्राट फ्रेमचे फलक लावण्याचा असतानाही विनाफ्रेमच्याच फलकांची गर्दी जास्त दिसत आहे. हे सर्व अनधिकृत असून नगरपालिकाही याकडे दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याचाच फायदा मोठ्या प्रमाणात विद्युत खांब अनधिकृत फलकांनी वेढलेले दिसून येत आहे.

एका खांबाचा खर्च वीस हजारांवर

शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी म्हणून शहरातील सहा प्रमुख मार्गावरील दुभाजकावर रेडियम असलेले २३६ विद्युत खांब लावण्यात आले. या एका खांबाचा खर्च वीस हजारांपेक्षा अधिक आहे. रात्रीच्या वेळी या खांबांचे रेडियम चकाकत असल्याने सौंदर्य आणखीच खुलते.

परंतु आता या खांबावर फलकबाजी सुरू असल्याने फलका बांधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तारांमुळे या खांबांचे रेडियम खराब होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या खांबावरील रेडियम खराब होऊन सौंदर्याचाही बोजवारा उडण्याची शक्यता आहे. असे झाल्यास या विद्युत खांबाकरिता पालिकेने केलेल्या कोट्यवधीचा खर्चही निरर्थक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here