जुन्या वाहनांची नव्याने नोंदणी करण अतिशय महागात पडणार! आठपट शुल्क आकारणार

नवी दिल्ली : एप्रिल २०२२ पासून १५ वर्षे जुन्या वाहनांच्या नोंदणी नूतनीकरणासाठी मालकास तब्बल आठपट अधिक शुल्क भरावे लागणार आहे. त्याचप्रमाणे व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस सर्टिफिकेटसाठीही आठपट अधिक शुल्क भरावे लागणार आहे. वाहनांच्या नोंदणीविषयीचे नवे नियम पुढील वर्षापासून लागू होत असून रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने यासंबंधीची अधिसूचना सोमवारी जारी केली.

दिल्ली व आजूबाजूच्या प्रदेशावर नव्या नियमांचा कोणताही परिणाम होणार नाही. कारण, येथे १० वर्षांपेक्षा जास्त जुन्या वाहनांवर आधीच बंदी घालण्यात आलेली आहे. १५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या कारच्या नोंदणी नूतनीकरणासाठी सध्या फक्त ६०० रुपये शुल्क लागते. अधिसूचनेनुसार, ते पुढील वर्षी ५ हजार रुपये होईल. जुन्या बाइक्सचे नोंदणी शुल्क ३०० रुपयांवरून १ हजार रुपये होईल. बस अथवा ट्रकचे फिटनेस सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारे शुल्क १,५०० रुपयांवरून १२,५०० रुपये होईल.

सूत्रांनी सांगितले की, लोकांनी जुनी वाहने बाळगू नयेत, यासाठी शुल्कांत वाढ करण्यात आली आहे. याशिवाय १५ वर्षांनंतर वाहनांच्या नोंदणीचे नूतनीकरण दर ५ वर्षांनी करावे लागेल. ८ वर्षांनंतर व्यावसायिक वाहनांना दरवर्षी फिटनेस सर्टिफिकेट घेणे बंधनकारक असेल. फिटनेस तपासणीसाठी स्वयंचलित यंत्राचा वापर करण्यास प्राधान्य दिले आहे.

उशीर झाल्यास लागणार विलंब शुल्क

वाहनांच्या नोंदणीच्या वेळेत नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. नूतनीकरणास उशीर झाल्यास प्रत्येक महिन्यासाठी ३०० रुपये विलंब शुल्क लागेल. व्यावसायिक वाहनांसाठीचे विलंब शुल्क ५०० रुपये असेल. फिटनेस सर्टिफिकेटच्या नूतनीकरणास उशीर झाल्यास दररोज ५० रुपयांचे विलंब शुल्क लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here