
वर्धा : स्थानिक गुन्हे शाखा वर्धा आणि वर्धा शहर पोलिसांनी संयुक्त कारवाईत देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपीला पकडून ६६ पेट्या देशी दारू व एक फोर्ड इकोस्पोर्ट कार असा एकूण १६ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, सावंगी (मेघे) येथून वर्ध्याकडे जाणाऱ्या मार्गावर देशी दारूची अवैध वाहतूक होत असल्याची खात्री पटली. त्यानंतर पथकाने सावंगी (मेघे) ते वर्धा मार्गावर सापळा लावून संशयित वाहन थांबवले. तपासात वाहन क्रमांक MH-31/FB-7745 मधून ६६ पेट्या देशी दारू सापडल्या.
ही दारू आरोपीने देशी दारू निर्मिती परवानगी नसलेल्या ठिकाणाहून अवैधरित्या खरेदी करून विक्रीसाठी आणत असल्याचे उघड झाले. जप्त केलेल्या दारू व वाहनाची एकूण किंमत १६,६०,००० रुपये आहे. आरोपीविरुद्ध वर्धा शहर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईत पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक बसवराज तेली, उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक रोहणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे हरीश शेख, अमर लढे, चंद्रकांत तुरुंगे, भूषण निकाळजे, धीरज आकळे, गजानन राठोड, अमोल नगराळे, मोहन चावडे आणि पथकातील इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.




















































