
सेलू : कुठलीही परवानगी न घेता वाळूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच येथील तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी स्वत: आपल्या सहकाऱ्यांसह मध्यरात्री धडक कारवाई करून वाळू भरलेली दोन वाहने पकडली. या कारवाईदरम्यान वाळूसाठ्यासह वाळूची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली वाहने जप्त करण्यात आली आहे.
तहसीलदारांनी धडक कारवाई दरम्यान सिंदी (रेल्वे) येथील वाळू चोरटा गजानन बापूराव डंभारे यांच्या मालकीचा एम. एच. ३२ ए. एच. ६९२९ क्रपांकाचा ट्रॅक्टर चालक नंदू कांबळे याच्या जवळून तर सिंदी (रेल्वे) येथीलच वाळू चोरटा राधेश्याम रामभाऊ गवळी यांच्या मालकीचा एम. एच. ३२ ए. एच. ७४२६ क्रमांकाचा ट्रॅक्टर चालक सूरज ठाकरे याच्या जवळून ताब्यात घेत जप्त केला. शिवाय वाहनातील सुमारे दोन ब्रास वाळूही जप्त करण्यात आली आहे. तहसीलदारांच्या या धडक कारवाईमुळे तालुक्यातील भुरट्या वाळू चोरांचे धाबे दणाणले आहेत. पुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.